अयोध्या – सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बाबरी मशीद-राम जन्मभूमी वादावर पडदा पडला. वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. तर मोक्याच्या ठिकाणी बाबरी मशिदीसाठी पाच एकर जागा देण्याचे आदेश दिले होते. काही महिन्यांपूर्वी राम मंदिराच्या कामाला सुरुवात झालेली असतानाच आता लवकरच बाबरी मशिदीच्या कामालाही सुरूवात होणार आहे. आता त्याच पाच एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या मशिदीचे डिझाईनही प्रसिद्ध करण्यात आले आहे.
शनिवारी अयोध्येतील धन्नीपूर गावात उभारण्यात येणाऱ्या मशिदीचे संकल्पचित्र इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशन ट्रस्टने प्रसिद्ध केले. मशिदीसाठी पाच एकर जागा अयोध्येपासून ३० किमी अंतरावर असलेल्या या गावात देण्यात आलेली आहे. फाऊंडेशनकडून मशिदीचे भव्यदिव्य संकल्पचित्र प्रसिद्ध करण्यात आले असून, मशिदीबरोबरच एक रुग्णालयाही उभारण्यात येणार आहे.
मशिदीचे संकल्पचित्र जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या आर्किटेक्ट विभागातील(स्थापत्य कला) प्रा. एस. एम. अख्तर यांनी तयार केले आहे. संबंधित विभागाकडून तयार करण्यात आलेल्या आरेखनाला वेळेत आवश्यक परवानग्या मिळाल्या, तर २६ जानेवारीपासून काम सुरू होऊ शकते. पण वेळेत जर परवानग्या मिळाल्या नाही, तर २६ जानेवारी ऐवजी दुसरी तारीख ठरवली जाईल, अशी माहिती ट्रस्टने दिली आहे.