शिर्डी : शिर्डी संस्थानाने नाताळच्या सुट्ट्यांमध्ये गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन साई दर्शनासाठी नवी नियमावली जारी केलीय. दर्शन पास काऊंटरवर गर्दीच्या काळात मिळणार नाही. संस्थानाच्या वेबसाईटवर साई भक्तांना पास आरक्षित करावा लागणार आहे. मार्गदर्शक सूचनांचे पालन करून गर्दीच्या काळात जास्तीत जास्त १२००० साईभक्तांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देणे शक्य होणार आहे. सशुल्क दर्शनपास आरक्षण केल्यापासून ५ दिवस आणि मोफत दर्शनपास आरक्षण तारखेपासून दोन दिवसांसाठी उपलब्ध असेल.
शिर्डी संस्थानाची नाताळमध्ये साई दर्शनासाठी नवी नियमावली
साई संस्थानची नवी नियमावली नाताळ सुट्ट्यांसाठी जाहीर करण्यात आली आहे. ऑनलाईन पासशिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. दर्शन पास संस्थानच्या वेबसाईटवरून घेणे अनिवार्य असणार आहे. १२ हजार भाविकांना दररोज प्रवेश देणे शक्य होणार असल्याचे म्हटले आहे. राज्य सरकारच्या आदेशानंतर पाडव्याच्या मुर्हूतावर लॉकडाऊन काळात बंद करण्यात आलेले शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. या मंदिरामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका दिवसात दररोज सहा हजार साईभक्तांना दर्शनाचा लाभ दिला जात होता. त्यानंतर दररोज साधारणपणे आठ ते नऊ हजार साईभक्तांना दर्शनाचा लाभ मिळावा, यादृष्टीने शिर्डी संस्थानने नियोजन सुरू केले होते. त्याप्रमाणे आता शिर्डी संस्थानने नाताळकरिता नवी नियमावली जाहीर केली आहे.