मुंबई – उच्च न्यायालयाने कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-३च्या कांजूरमार्ग येथील कारशेडला दिलेल्या स्थगितीमुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) कोंडी झाली असल्यामुळे पुन्हा एकदा आपल्या अन्य मेट्रो प्रकल्पांच्या कारशेडसाठी प्राधिकरणाने नव्या जागेचा शोध सुरू केला आहे. त्यानुसार नगरविकास विभागाकडे जोगेश्वरी- कांजूरमार्ग मेट्रोसाठी पहाडी गोरेगाव येथील जागेची मागणी करण्यात आली आहे.
एमएमआरडीएकडून मेट्रो प्रकल्पांच्या कारशेडसाठी नव्या जागेची शोधाशोध
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनवर कुलाबा- वांद्रे-सिप्झ मेट्रो-३ची उभारणी करण्याची जबाबदारी आहे. तर एमएमआरडीए अन्य सर्व मेट्रो मार्गाची उभारणी करते. कांजूरमार्ग येथे मेट्रो-३ प्रकल्पाची आरेमधील कारशेड स्थलांतरित करण्याच्या निर्णयाचा सर्वाधिक लाभ एमएमआरडीएला होणार होता. कांजूरमार्गची १०२ हेक्टर जमीन मंबईत कारशेडसाठी जागेची शोधाशोध करणाऱ्या प्राधिकरणाला देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-वडाळा-ठाणे- कासारवडवली-मेट्रो-४ तसेच जोगेश्वरी-कांजूरमार्ग मेट्रो-६ मार्गासाठी कांजूरमार्ग येथेच कारशेड उभारण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला होता. त्याचबरोबर प्राधिकरणाने कांजूरमार्ग- बदलापूर मेट्रो १४चे स्थानकासह एकाच ठिकाणी तीन कारशेड आणि तीन स्थानके आणि मध्यवर्ती मेट्रो टर्मिनस उभारण्याची योजना आखली होती. त्यासाठीचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याची जबाबादरी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनवर सोपविण्यात आली होती.
प्राधिकरणाची सुमारे चार-पाच हजार कोटी रुपयांची बचत कांजूरमार्गामुळे होणार होती. पण प्राधिकरण आणि राज्य सरकारला उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे धक्का बसला आहे. प्राधिकरणाने पुन्हा एकदा कारशेडसाठी पूर्वीप्रमाणे जागेचा शोध सुरू केला आहे. त्यानुसार जोगेश्वरी-कांजूरमार्ग मेट्रो-६ मार्गासाठी पहाडी गोरेगाव येथे कारशेड उभारण्यासाठी आवश्यक जागा मिळावी अशी मागणी प्राधिकरणाने नगरविकास विभागाकडे पत्राद्वारे केली आहे.