प्योंगयांग : उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन याच्या सणकीपणाचे अनेक किस्से आपण आजवर ऐकले आहेत. आजवर त्याने अगदी शुल्लक भासणाऱ्या कारणांमुळे सामान्य नागरिकांपासून ते अनेक नातेवाईकांची हत्या केली आहे. किम जोंगची सणकी वृत्ती त्याच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये देखील पूरेपूर भिनली आहे. नुकतीच एका जहाजाच्या कॅप्टनची सर्वांसमोर गोळी मारुन या अधिकाऱ्यांनी हत्या केली. बंदी असलेल्या परदेशी रेडिओवरील स्टेशनचे प्रसारण हा कॅप्टन ऐकत होता.
बंदी असलेला परदेशी रेडिओ ऐकला म्हणून किम जोंगच्या अधिकाऱ्यांनी केली हत्या
या संदर्भात ‘रेडिओ फ्री एशिया’ने (RFA) दिलेल्या वृत्तानुसार या प्रकरणात हत्या झालेल्या कॅप्टनचे चोई असे नाव आहे. चोई हा 50 जहाजांचा मालक होता. तो बंदी घातलेल्या रेडिओचे प्रसारण ऐकत असल्याची माहिती त्याच्या एका स्टाफने लष्कराला दिल्यानंतर लष्करी अधिकाऱ्यांनी सर्व स्टाफ समोर त्याची गोळ्या झाडून हत्या केली.
पूर्वी लष्करात चोई हा रेडिओ ऑपरेटर होता. त्या नोकरीच्या दरम्यान त्याने विदेशी ब्रॉडकास्ट ऐकण्यास सुरुवात केली होती. उत्तर कोरियाच्या नियमानुसार लष्कराची नोकरी सोडलेल्या अधिकाऱ्यांना या रेडिओचे प्रसारण ऐकता येत नाही. या प्रकरणानंतर त्या भागात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या अधिकाऱ्यांची देखील हकालपट्टी करण्यात आली आहे. या सर्वांची आता चौकशी करण्यात येणार असून त्यानंतर उत्तर कोरियातील नियमांप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. या अधिकाऱ्यांवर चोईच्या अपराधांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. तसेच त्यांनी त्याच्याकडून कोणती लाच स्विकारली होती का? याचीही चौकशी केली जाणार आहे.
जहाजतील कर्मचाऱ्यांशी चोईचे पटत नसल्यामुळेच त्याची तक्रार लष्करी अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्याची माहिती देखील आता उघड झाली आहे. किम जोंग सरकारने उत्तर कोरियात कोणत्या विदेशी रेडिओचे प्रसारण ऐकावे याची कडक नियमावली केली आहे. सरकारच्या या नियमांचे उल्लंघन करुन अनेक नागरिक छुप्या पद्धतीने विदेशी रेडिओ ऐकतात. या सर्वांना कडक इशारा देण्यासाठी चोईची हत्या करण्यात आली आहे.