श्रीनगर: जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची तब्बल ११ कोटी ८६ लाख रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालयानाने जप्त केली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष असलेल्या अब्दुल्ला यांच्यावर जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनमधील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईला न्यायालयात आव्हान देण्यात येईल अशी माहिती अब्दुल्ला यांचे चिरंजीव आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली.
फारुख अब्दुल्ला यांची करोडोंची मालमत्ता जप्त
सन २००२ ते २०११ या कालावधीत जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनमध्ये झालेल्या ४३ कोटी ६९ लाख रुपयांच्या गैरव्यवहारांबद्दल केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सन २०१८ साली आरोपपत्र दाखल केले आहे. फारुख अब्दुल्ला यांनी असोसिएशनमधील आपल्या पदाचा गैरवापर करून संस्थेच्या बँक खात्यातील पैसे काढल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
फारुख अब्दुल्ला यांच्या ३ निवासी, एक व्यावसायिक मालमत्ता आणि ४ भूखंड अशा मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी अब्दुल्ला यांच्याकडे ऑकटोबर महिन्यात चौकशी करण्यात आली होती.