मुकेश अंबानींच्या मुलाच्या पुढाकाराने गुजरातमध्ये उभारले जाणार जगातील सर्वात मोठे पक्षी संग्रहालय !


अहमदाबाद: मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आता अनोखा उपक्रम हाती घेतला असून जगातील सर्वात मोठे पक्षी संग्रहालय रिलायन्स उभारणार आहे. हे पक्षी संग्रहालय गुजरातच्या जामनगरमध्ये साकारण्यात येणार आहे. हे पक्षी संग्रहालय उद्योगपती मुकेश अंबानी यांचे छोटे चिरंजीव अनंत अंबानी यांच्या देखरेखीत साकारले जाणार आहे.

जगातील हे सर्वात मोठे पक्षी संग्रहालय 280 एकर परिसरात उभारण्यात येणार आहे. 100 वेगवेगळ्या प्रजातींचे पक्षी आणि साप या पक्षी संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत. हे पक्षी संग्रहालय येत्या दोन वर्षात जनतेसाठी खुले करण्यात येणार आहे. देशात कोरोनाचे संकट असल्यामुळे या पक्षी संग्रहालयाच्या उभारणीस विलंब झाला असून आता हे पक्षी संग्रहालय झपाट्याने उभारण्यात येणार असल्याचे रिलायन्सच्या कार्यकारी समितीने स्पष्ट केले आहे.

ग्रीन्स जूलॉजिकल, रेस्क्यू अँड रिहॅब्लिटेशन किंगडम असे या पक्षी संग्रहालयाला म्हटले जाईल, असे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे संचालक परिमल नथवाणी यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारने हे पक्षी संग्रहालय उभारण्यासाठी परवानगी दिलेली आहे. प्राण्यांच्या प्रजातीनुसार सेक्शन या पक्षी संग्रहालयात तयार करण्यात येणार आहे. त्याला फॉरेस्ट ऑफ इंडिया, फ्रॉग हाऊस, इन्सेक्ट लाइफ, ड्रॅग्न्स लँड, एक्सोटिक आयलँड आदी नावे देण्यात येणार आहे. त्याची माहिती केंद्राच्या संकेतस्थळावरही देण्यात येणार आहे.

एकाचवेळी विविध प्रजातीचे पशू-पक्षी जगातील या सर्वात मोठ्या पक्षी संग्रहालयात पाहायला मिळणार आहे. त्यात बार्किंग हरिण, स्लेंडर लोरीस, स्लॉथ बियर, फिशिंग कॅट, कोमोडो ड्रॅगन आदींचा समावेश असेल. या संग्रहालयात भारतीय प्राण्यांचाही मोठ्या प्रमाणावर भरणा असेल. तसेच आफ्रिकन सिंहही पाहायला मिळणार आहे. 12 शहामृग, 20 जिराफ, 10 कायमॅन, 7 बिबटे, आफ्रिकन हत्ती आणि 9 ग्रेट इंडियन बस्टर्डही या संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत. तर बेडकांचा एक सेक्शन असणार असून त्यात 200 उभयचर प्राणी ठेवण्यात येणार आहे. तसेच 350 प्रकारचे मासेही या संग्रहालयात पाहायला मिळणार आहेत. जामनगरमध्ये एक केंद्रही रिलान्सने स्थापन केले आहे. या ठिकाणी एका बिबट्याला आणण्यात आले होते. हे केंद्र जखमी प्राण्यांवर उपचार करण्यासाठी स्थापन करण्यात आल्यामुळे या प्राण्यांना उपचारही मिळण्यास मदत होणार आहे.