अपप्रचाराला बळी पडू नका: कृषिमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन


नवी दिल्ली: नव्या कृषी कायद्यांच्या संदर्भात अपप्रचार करून राजकीय लाभ उठविण्याच्या दृष्टिकोनातून काही जण शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. त्यांच्या अपप्रचाराला बळी पडू नका; असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी केले आहे.

देशभरातील शेतकऱ्यांनी नव्या कायद्यांचा लाभ घेण्यास सुरूवात केली आहे. मात्र, काही शेतकरी संघटना शेतकऱ्यांमध्ये कृषी कायद्याबाबत संभ्रम निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहेत, असे तोमर यांनी आंदोलक शेतकऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

या नव्या कायद्यांबाबत, किमान हमी भाव, कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि शेतकऱ्यांच्या जमिनीवरील मालकी याबाबत संभ्रम पसरविला जात आहे. काही जण राजकीय फायदा उठविण्यासाठी या अफवा पसरवीत आहेत. मी स्वतः माझ्या शेतीला रात्री उशिरापर्यंत पाणी देण्यासाठी जागरण करतो. माझा शेतमाल विकण्यासाठी दीर्घकाळ वाट बघतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची मला नेमकी जाणीव आहे, असे तोमर यांनी या पत्रात म्हटले आहे. किमान हमी भाव रद्द करण्यात आल्याची अफवा काही जण मुद्दाम पसरवीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

केंद्र सरकारची धोरणे आणि उद्दिष्ट शेतकऱ्यांच्या हिताचीच आहेत. किमान हमी भाव कायम राहतील. ज्या काळात लेह लद्दाखमध्ये राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आहे, ज्या काळात देशाच्या काही भागात हिमवृष्टीही सुरु आहे, त्या काळात रेल्वे अडवून जवानांना पुरविली जाणारी साधनसामुग्री अडविणाऱ्यांना खरे शेतकरी म्हणता येणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.