बलात्काऱ्याला नपुंसक बनवणाऱ्या कठोर कायद्याला पाकिस्तानात मंजुरी


इस्लामाबाद – बलात्काराविरोधात कठोर कायदा पाकिस्तानमध्ये करण्यात आला असून लवकरात लवकर बलात्कार प्रकरणाची सुनावणी करणे, त्याचबरोबर कठोर शिक्षा देण्याची या कायद्यात तरतूद आहे. तसेच दोषी आढळलेल्या व्यक्तीला नपुंसक करण्याचाही या कायद्यात उल्लेख आहे. यासंदर्भातील वृत्त बीबीसीने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी या नव्या कायद्यावर मंगळवारी स्वाक्षरी करण्यात आली आहे.

बलात्कारासारख्या गंभीर प्रकरणात सहभागी असणाऱ्यांचे नव्या कायद्यामध्ये नॅशनल रजिस्टर तयार केले जाणार आहे. त्याचबरोबर पीडितेची ओळख गुप्त ठेवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात राष्ट्रपती भवनाकडून निवेदन प्रसिद्ध करण्यात आले असून या नव्या अध्यादेशांतर्गत लवकर बलात्कार प्रकरणांची सुनावणी व्हावी, यासाठी देशभरात विशेष न्यायालये उभारली जाणार असून बलात्काराच्या प्रकरणाचा निकाल चार महिन्याच्या आत लावला जाईल.

नव्या अध्यादेशानुसार, पीडितेची ओळख जाहीर करण्यास मनाई आहे आणि तसे केल्यास शिक्षा होऊ शकते. पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांकडून जर योग्य प्रकारे तपास झाला नाही तर त्यांना तीन वर्षांपर्यंत जेल होऊ शकते. त्याचबरोबर पोलीस किंवा सरकारी अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देणाऱ्यांनाही शिक्षा दिली जाईल. निवेदनात देण्यात आलेल्या माहितीनुसार, वारंवार गुन्हा करणाऱ्यांना नपुंसक बनवण्यात येईल. पंतप्रधानांकडून निधी सुरु करण्यात येणार असून, विशेष न्यायालये उभारण्यासाठी तो पैसा वापरला जाणार आहे. याशिवाय राज्य सरकारेही आर्थित मदत उभी करतील, अशी माहिती निवेदनात देण्यात आली आहे.