आता बिहारमधील नागरिकांना देखील देण्यात येणार मोफत कोरोना लस


बिहार : मंगळवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एक मोठा निर्णय घेतला असून त्यानुसार राज्यातील जनतेला बिहार सरकारकडून कोरोना प्रतिबंधक लस मोफत दिली जाणार आहे. 15 महत्त्वपूर्ण निर्णयांना मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. नितीश सरकारच्या पुढील पंचवार्षिक कार्यक्रमाच्या योजनेस या बैठकीत मान्यता देण्यात आली. एनडीएने निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासंदर्भात या बैठकीत मंजूरी देण्यात आली.

मोफत कोरोना लस, शिक्षण आणि तरूणांचे रोजगार, पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन रक्कम, जन्मत: हृदयात छिद्र असलेल्या लहान मुलांवर विनामूल्य उपचार यांसारखे महत्वाचे निर्णय मंत्रिमंडळाच्या या बैठकीत घेण्यात आले. नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर हे स्पष्ट झाले आहे की बिहारमधील सामान्य लोकांना विनामूल्य कोरोनाची लस दिली जाणार आहे. आता लवकरच संबंधित विभागातून त्यासंबंधीत अधिसूचना जारी करण्यात येईल.