पुणे – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पुणे पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरोधात चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हर्षवर्धन जाधव आणि अजून एका महिलेविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याच्या आऱोपाखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. अमन चड्डा यांनी हर्षवर्धन जाधव आणि इशा झा या दोघा विरोधात फिर्याद दिली होती.
हर्षवर्धन जाधव यांना चतुःशृंगी पोलिसांनी केली अटक
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळच्या सुमारास तक्रारदार अमन चड्डा आई, वडिलांना दुचाकीवरून ब्रेमन चौकाकडे घेऊन जात होते. हर्षवर्धन जाधव आणि इशा झा हे याचवेळी रस्त्याच्या बाजूला एका चारचाकीमध्ये बसले होते. अचानक कारचा दरवाजा उघडल्यामुळे चड्डा यांच्या दुचाकीचा अपघात झाल्यानंतर चार चाकीमध्ये बसलेल्या हर्षवर्धन जाधव आणि ईशा यांना चड्डा यांनी जाब विचारला.
हर्षवर्धन जाधव आणि इशा झा यांनी त्यावर अमन चड्डा आणि त्यांच्या वडिलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. चड्डा यांनी त्यावेळी वडिलांच्या हृदयाचे ऑपरेशन झाल्याचे सांगितले. पण दोघांनी तरी देखील मारहाण करणे चालूच ठेवलं. यानंतर अमन चड्डा यांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार हर्षवर्धन जाधव यांना अटक करण्यात आली असून बुधवारी सकाळी शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर केले जाणार असल्याची माहिती चतुःशृंगी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी दिली आहे.