जपानच्या ‘ट्विटर किलर’ टाकाहिरो शिराइशीला मृत्युदंडाची शिक्षा


टोकियो – जपानमध्ये माइक्रोब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरद्वारे संपर्क साधून 9 लोकांची हत्या करणाऱ्या एका व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2017 मध्ये पोलिसांनी ‘ट्विटर किलर’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या टाकाहिरो शिराइशी याला अटक केली होती. त्याच्या फ्लॅटमधून त्यावेळी मानवी शरीराचे तुकडे सापडले होते. जपानमध्ये या हाय-प्रोफाइल घटनेमुळे खळबळ उडाली होती.

30 वर्षीय टाकाहिरोने 2017 मध्ये अटक केल्यानंतर पोलिसांच्या चौकशीत हत्या करुन मृतदेहांचे तुकडे केल्याची कबुली दिली. हत्या केलेल्यांपैकी बहुतांश महिला होत्या, तो त्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे संपर्क साधून भेटला होता. आत्महत्येचा विचार करणाऱ्या महिलांशी टाकाहिरो ट्विटरद्वारे संपर्क साधायचा. मी तुमची जीवन संपवण्यामध्ये मदत करेन, असे तो त्यांना सांगायचा, काही घटनांमध्ये तर मी स्वतःही तुमच्यासोबत माझे जीवन संपवेन असे सांगायचा.

त्यानंतर घरी बोलावून त्या महिलांची हत्या करायचा. त्याने ऑगस्ट 2017 ते ऑक्टोबर 2017 या कालावधीत 15 ते 26 वर्षांच्या आठ महिला आणि एका पुरूषाची गळा दाबून हत्या केल्यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे केल्याचे वृत्त जपानच्या क्योडो या वृत्तसंस्थेने दिले आहे. पोलीस 2017 मध्ये एका 23 वर्षीय बेपत्ता महिलेचा शोध घेत असताना पोलिसांना टोकियोजवळील झामा या शहरात टाकाहिरोच्या फ्लॅटमधून मानवी शरीराचे काही तुकडे भेटले आणि या घटनेचा खुलासा झाला. त्याच्या फ्लॅटमधून पोलिसांना हात आणि पायाची हाडे याव्यतिरिक्त नऊ मानवी शीर भेटल्यानंतर जपानच्या माध्यमांमध्ये ‘हाउस ऑफ हॉरर’ अशी त्याच्या घराची ओळख झाली.

सरकारी वकिलांनी न्यायालयात सुनावणीदरम्यान टाकाहिरोसाठी फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती, पण फाशीच्या शिक्षेला विरोध करत संमतीने हत्या झाल्याचा युक्तिवाद टाकाहिरोच्या वकिलांनी केला होता. पण, नंतर आपल्या वकिलांसोबतच टाकाहिरोचे मतभेद झाले आणि संमती नसताना हत्या केल्याचे त्याने न्यायालयासमोर कबुल केले. अखेर मंगळवारी न्यायाधीशांनी फाशीच्या शिक्षेचा आदेश देताना एकाही पीडिताची हत्येसाठी संमती नसल्याचे नमूद केले.

दरम्यान, जपानमध्ये या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. सोशल मीडियावर या घटनेनंतर आत्महत्येबाबत चर्चा होऊ नये, यासाठी जोरदार विरोध व्हायला सुरूवात झाली होती. त्यावेळी जपानच्या सरकारकडून नवीन कायदा आणण्याचे संकेत देण्यात आले होते.