यामुळे दोन दिवस बंद राहणार स्टेट बँकेच्या काही सेवा


नवी दिल्ली : 16 आणि 17 डिसेंबर 2020 या दरम्यान स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) काही ग्राहकांना काही सेवांचा वापर करताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मेंटेनन्सचे काम या बँकेतील काही सेवांमध्ये सुरू असल्याने त्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. पण बँकेचे असे म्हणणे आहे की, सर्व ग्राहकांवर यामुळे परिणाम होणार नाही. यावेळी केवळ एनआरआय सेवांवर परिणाम होणार आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी एसबीआयने एक ट्विट केले असून त्यानुसार 15 ते 17 डिसेंबर दरम्यान मेंटेनन्ससाठी मिस्ड कॉल आणि SMS च्या माध्यमातून बँकेच्या एनआरआय सेवा काम करणार नाहीत.

त्याचबरोबर ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल एसबीआयने ट्विट करून दिलगिरी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे बँकेच्या इतर डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. एसबीआयचे असे म्हणणे आहे की ग्राहकांना एखाद्या अडथळ्याशिवाय बँकिंग अनुभव मिळावा याकरिता बँकेच्या सुविधा उत्तम करण्यासाठी मेंटेनन्सची आवश्यकता आहे. YONO SBI app ची सुविधा डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला बंद पडली होती. त्यावेळी ग्राहकांना मोठ्या प्रमाणात अडथळ्यांचा सामना करावा लागला होता. बँकेच्या ट्विटर हँडलवर यावेळी ग्राहकांनी विविध तक्रारी देखील केल्या होत्या. बँकेनी सिस्टम आउटेजमुळे मोबाइल अॅपवर परिणाम झाल्याचे त्यावेळी सांगितले होते.

22 नोव्हेंबर रोजी याआधी एसबीआयने त्यांचा इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्म अपग्रेड केला होता. ग्राहकांना त्यावेळी इंटरनेट बँकिंग, YONO, YONO lite यासारख्या सुविधा वापरताना काही समस्यांचा सामना करावा लागला होता. ग्राहकांना अशाच प्रकारे समस्येचा सामना ऑक्टोबर महिन्यातही करावा लागला होता. योनो एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडियाचा एक इंटिग्रेटेड डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. या माध्यमातून युजर्स एसबीआयच्या सर्व बँकिंग सेवांचा लाभ घेऊ शकतात.