आता एकाच अ‍ॅपवर Post Office आणि Payment Bank ची सुविधा


नवी दिल्ली – पोस्ट ऑफिसमध्ये आणि पोस्ट ऑफिस पेमेंट बँकेत तुमचे अकाउंट असेल तर आता या दोघांच्या बँकिंग सेवा तुम्ही एकाच अ‍ॅपवर वापरु शकणार आहात. मंगळवारी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी) आणि टपाल विभाग (डीओपी) यांनी नवीन डिजिटल पेमेंट अ‍ॅप ‘डाकपे’ (DakPay) लाँच केले. एका व्हर्चुअल इव्हेंटमध्ये DakPay अ‍ॅप लाँच करण्यात आले, यावेळी दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद देखील उपस्थित होते.

बँकिंग आणि टपालच्या अन्य सेवाही या नवीन डिजिटल पेमेंट अ‍ॅपद्वारे वापरता येतील. हे अ‍ॅप गुगल प्ले-स्टोअरवरुन फ्रीमध्ये डाउनलोड करता येईल. डाउनलोड केल्यानंतर नाव, मोबाइल नंबर आणि पिन कोड टाकून अ‍ॅपमध्ये प्रोफाइल बनवावी लागेल. यानंतर तुम्ही तुमचे बँक अकाउंट अ‍ॅपसोबत लिंक करु शकतात. तुम्ही एकापेक्षा जास्त बँकही लिंक करु शकतात. यानंतर युपीआय किंवा अन्य प्रकारे मनी ट्रान्सफर करता येईल. या अ‍ॅपमध्येही युपीआय अ‍ॅपप्रमाणे चार अंकी पिन नंबर क्रिएट करावा लागेल.

डिजिटल पेमेंटसाठी ‘DakPay’ या अ‍ॅपमध्ये क्यूआर कोड स्कॅन करण्याचा पर्याय आहे. ग्राहक ‘डाकपे’च्या माध्यमातून डोमेस्टिक मनी ट्रान्सफर अर्थात डीएमटीद्वारे पैसे पाठवू शकतात. कोणत्याही सेवा किंवा मर्चंटला व्हर्च्युअल डेबिट कार्ड आणि यूपीआयच्या माध्यमातून पैसे पाठवू शकता. बायोमेट्रिकद्वारे कॅशलेस इकोसिस्टम तयार करण्यात अ‍ॅप मदत करेल. याद्वारे, कोणत्याही बँकेच्या ग्राहकांना परस्पर व्यवहार करण्यायोग्य बँकिंग सेवा मिळतील. युटिलिटी बिल देखील तुम्ही भरु शकता.