या भागात काळ्या रंगात रंगविली जातात घरे

घर हा माणसाच्या निवाऱ्याचा महत्वाचा भाग. आपले घर सुंदर असावे यासाठी माणसे अनेक प्रकारे घरे सजवितात. त्यात सर्वाधिक प्राधान्य असते रंगाला. आकर्षक रंगात रंगलेली घरे पाहणाऱ्याला सुद्धा आनंद देतात. रंगाच्या अनेक कंपन्या त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या रंगांचे गुणधर्म आणि प्रकार ग्राहकाला समजावे म्हणून कॅटलॉग तयार करतात. या कॅटलॉग मध्ये काळा रंग बहुदा नसतो कारण घरासाठी काळ्या रंगाला मागणीच नसते. त्यामुळे कुठले घर काळ्या रंगात रंगविले आहे असे डोळ्यासमोर सुद्धा आणणे अवघड आहे.

पण भारत देश विविधतेने नटलेला देश असल्याचे आपल्या देशात छतीसगढ़ राज्यात आदिवासी भागात गेलात तर तुम्हाला फक्त काळ्या रंगात रंगविलेली घरेच दिसू शकतील. जशपुर जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागात अशी घरे पाहायला मिळतात. घरातील फारश्या, भिंती सुद्धा काळ्या केल्या जातात. अर्थात यामागे काही कारणे आहेत. ही परंपरा फार पूर्वीपासून पाळली जाते.

असे सांगतात की आदिवासी आपल्या सर्व समाजात एकजूट राहावी म्हणून एकच रंगाने घरे रंगवितात. दिवाळीच्या सुमारास हे रंगकाम केले जाते आणि त्यात काळ्या मातीपासून घरे रंगविली जातात. जेथे काळी माती मिळत नसेल तेथे शेतातील पिके कापल्यावर उरलेले बुडके जाळून, टायर जाळून जी काजळी येते त्यापासून काळा रंग बनवून घरे रंगविली जातात. या घरात दिवसही इतका अंधार असतो की खोलीत कोणत्या वस्तू आहेत ते फक्त घरातला रहिवासीच सांगू शकतो.

मुळात आदिवासीच्या घराला खिडक्या कमीच असतात. अगदी छोटे झरोके उजेड यावा म्हणून ठेवलेले असतात. घरात प्रकाश कमी असल्याने चोरीची भीती राहत नाही. शिवाय काळ्या रंगाच्या भिंती सर्व ऋतू मध्ये आरामदायी असतात. शिवाय आदिवासी घराच्या भिंतींवर अनेक चित्रकृती रेखाटतात, काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर ही नक्षी मोठी देखणी आणि उठून दिसते. म्हणूनही या भागात काळ्या रंगात घरे रंगविली जातात.