अर्णब गोस्वामी आणि कंगनाच्या समर्थानात फडणवीसांची जोरदार ‘बॅटिंग’


मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य सरकारवर रिपब्लिक टीव्हीचे मालक अर्णब गोस्वामी यांची अटक व कंगना राणावत हिच्या कार्यालयावरील कारवाईच्या प्रकरणावरून जोरदार टीका केली. खून करणाऱ्यास फाशी झालीच पाहिजे, चोरी करणाऱ्यास शिक्षा झालीच पाहिजे. पण हे पाकिस्तान नाही. येथे कायद्याचे राज्य असून ते कायद्यानेच चालवा, असा टोला फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

फडणवीस पुरवणी मागण्यांवरील चर्चेत बोलत होते. फडणवीस यांनी राज्यात आणीबाणीसारखी परिस्थिती असल्याचा पुनरुच्चार केला. त्यांनी त्यासाठी गोस्वामी व कंगना प्रकरणाचा दाखला दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्याबद्दल जी वक्तव्ये अर्णब गोस्वामी यांनी केली, ती चुकीचीच असून त्याचा मी निषेधच करतो. असे बोलण्याचा त्यांना अधिकार नाही. माझ्याही विरोधात याच अर्णब गोस्वामी यांनी एकदाच नव्हे तर तीनदा ‘मीडिया ट्रायल’ चालवली होती. मी अमेरिकेत असताना माझ्या मागे कॅमेरे लावण्यात आले होते. तिथे गुंतवणूकदारांची भेट मी घेत होतो आणि ह्यांचे कॅमेरे वेगळेच काम करत होते. पण भारतात आल्यानंतर मी म्हणून त्यांना जेलमध्ये टाकले नाही. त्यांना उत्तर दिले. हा फरक असल्याचे फडणवीस म्हणाले.

फडणवीसांनी अभिनेत्री कंगना राणावत हिच्या प्रकरणातील सरकारच्या भूमिकेलाही आक्षेप घेतला. खून केला त्याला फाशी दिलीच पाहिजे, चोरी केली शिक्षा झालीच पाहिजे. पण येथे कायद्याचे राज्य आहे. अब्रुनुकसानीचा खटला तुम्ही दाखल करू शकता. पण, मनात आले म्हणून तुम्ही कोणाचे घर तोडू शकत नाही. हे पाकिस्तान नसल्याचे फडणवीस यांनी सुनावले. सत्ता डोक्यात जाता कामा नये. कितीही काळ राज्य कारभार चालवा. २५ वर्षे चालवा. २७ वर्षे चालवा, पण कायद्याने चालवा, असा चिमटाही त्यांनी काढला.

Loading RSS Feed