५० रुपयांनी महागला गॅस सिलिंडर, असे आहेत नवे दर


नवी दिल्ली – एलपीजी गॅसच्या किंमतींमध्ये तेल कंपन्यांनी मोठी वाढ केली असून घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. तर १८ रुपयांनी पाच किलोच्या गॅसच्या किंमती वाढवल्या आहेत. त्याचप्रमाणे आता ३६.५० रुपये जास्त १९ किलो सिलिंडरसाठी मोजावे लागणार आहे. देशातील सर्वात मोठी तेल कंपनी असणाऱ्या आयओसीने दिलेल्या माहितीनुसार आता दिल्लीमध्ये १४.२ किलोचा गॅस सिलिंडर ६४४ रुपयांना झाला असून तो कोलकात्याने ६७०.५० रुपये तर मुंबईत ६४४ रुपयांपर्यंत पोहचला आहे. ६६० रुपये चेन्नईमध्ये गॅस सिलिंडरसाठी मोजावे लागत आहेत.

आजची दरवाढ होण्याआधी दिल्लीमध्ये १४.२ किलो गॅस सिलिंडरचे दर ५९४ रुपये एवढे होते. तर ६२०.५० रुपये कोलकात्यामध्ये आणि ५९४ रुपयांना मुंबईमध्ये गॅस सिलिंडर मिळायचा. पण यासाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार असल्यामुळे सर्वासामान्यांच्या खिशाला या दरवाढीची झळ बसणार आहे. दिल्लीमधील १९ किलोच्या सिलिंडरची किंमत एक हजार २९६ रुपये, एक हजार ३५१ रुपये ५० पैसे कोलकात्यामध्ये, एक हजार २४४ रुपये मुंबईमध्ये आणि एक हजार ४१० रुपये ५० पैशांपर्यंत चेन्नईमध्ये गेली आहे. गॅस सिलिंडरवर देण्यात येणाऱ्या सबसिडीअंतर्गत केंद्र सरकार प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी १२ गॅस सिलिंडरवर सूट देते. या कालावधीमध्ये ग्राहकांना अधिक सिलिंडर लागले तर ते त्यांना बाजार भावात विकत घ्यावे लागतात.

दर महिन्याला गॅस सिलिंडरच्या किंमतीची तपासणी करुन आंतरराष्ट्रीय दर आणि विदेशातील दरांनुसार तेल कंपन्या गॅस सिलिंडरचे दर निश्चित करत असतात. गॅसच्या किंमती जाणून घेण्यासाठी ग्राहकांना https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकला भेट देता येईल. येथे आपल्या शहराचे नाव सिलेक्ट करुन शहरातील गॅसचे दर जाणून घेता येतील.