संसदेचे हिवाळी अधिवेशन कोरोना व्हायरसमुळे रद्द


नवी दिल्ली – सर्वच राजकीय पक्षांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अधिवेशन रद्द करण्यासाठी अनुकूलता दर्शवली आहे. आता अर्थसंकल्पीय अधिवेशन थेट जानेवारीत होईल असे संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेतील काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. पण आमच्याशी चर्चा करण्यात आली नसल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

वादग्रस्त कृषि कायद्यांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलवण्याची मागणी काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी केली होती. या कृषी कायद्यांवरुन सध्या दिल्लीच्या सीमेवर जोरदार आंदोलन सुरु आहे. काही दुरुस्त्या या कृषी कायद्यांमध्ये करण्याची आवश्यकता असल्याचे अधीररंजन चौधरी यांनी म्हटले होते.

प्रल्हाद जोशी यांनी अधीररंजन चौधरी यांना पाठवलेल्या पत्रात सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा केली, पण कोरोनामुळे हिवाळी अधिवेशन बोलवू नये, यावर सर्वांचे एकमत झाले असल्याचे असे म्हटले आहे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, हिवाळ्याचे महिने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे जोशी यांनी अधीररंजन चौधरींना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. पावसाळी अधिवेशन कोरोनामुळे सुद्धा उशीराने सप्टेंबर महिन्यात झाले होते.