राज्य सरकारने मराठा तरुणांच्या संयमाचा अंत पाहू नये – प्रविण दरेकर


मुंबई – सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच चर्चेत आहे. ९ डिसेंबरला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने या आरक्षणावरील स्थगिती कायम ठेवल्यानंतर राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या बाबतीत गंभीर नसल्याचे आरोप राज्यातील भाजप नेत्यांकडून केले जात आहेत. राज्य सरकारचा एकही मंत्री किंवा महाधिवक्ता महत्त्वाची सुनावणी असताना दिल्लीत हजर नसल्याच्या मुद्द्यावरूनही खूप टीका करण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी इशारा दिला.


यासंदर्भात प्रवीण दरेकर यांनी एक व्हिडीओ ट्विट केला असून काही मराठा तरूण त्यात आंदोलन करताना दिसले. एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजीही होताना दिसली. यासोबतच त्यांनी एक ट्विटदेखील केले आहे. त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून सरकारला इशारा दिला आहे. आघाडी सरकारचं मोघलाईचं राज्य सुरु आहे. आंदोलनकर्त्या मराठा तरुणांवर केसेस दाखल करण्यात आल्या.अधिवेशन चालू असताना लोकशाही मार्गाने आंदोलनासाठी मुंबईत येणाऱ्या मराठा तरुणांना ठिकठिकाणी अडवण्यात येत आहे.तरुणांच्या संयमाचा अंत पाहू नका., असा इशारा त्यांनी उद्धव ठाकरे सरकारला दिला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही मराठा आरक्षणाच्या सरकारच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. मराठा आरक्षणाची स्थगिती सरकारची पूर्वतयारी नसल्याने कायम राहिली. ठाकरे सरकारची ही नाचक्की आहे. न्यायालयात पुन्हा-पुन्हा तेच तेच मुद्दे मांडले गेले. मुकुल रोहतगी यांनी न्यायालयापुढे कोणतेही नवे मुद्दे मांडले नाहीत. पुनर्विचार याचिका जेव्हा दाखल केली जाते, तेव्हा नवे मुद्दे मांडायचे असतात. जे मुद्दे मागच्या वेळी मांडले, तेच पुन्हा मांडले गेले म्हणून यावरची स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. पण याबाबत सरकारला गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे, असे रोखठोक मत त्यांनी व्यक्त केले.