आता येणार ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदवर आधारित बायोपिक


विश्वविजेते दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची नुकतीच घोषणा करण्यात आली असून चित्रपट निर्माते आनंद एल राय या बायोपिकचे दिग्दर्शन करणार आहेत. व्यापार चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबाबत माहिती देणारे एक ट्विट रविवारी केले, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी विश्वनाथन आनंद यांच्या जीवनावर आधारित बायोपिक येणार आहे. आनंद एल राय ‘ए बायोपिक ऑन इंडियन चेस ग्रँडमास्टर विश्वनाथन’ या अनटायटल्ड बायोपिकचे दिग्दर्शन करणार असून या याची निर्मिती सुंदर एंटरटेनमेंट (महावीर जैन) आणि कलर यलो प्रॉडक्शन (आनंद एल. राय) करणार आहेत.

या चरित्रपटाची मुख्य सूत्रे ‘तनू वेड्स मनू’ आणि ‘रांझणा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन तसेच ‘मुक्काबाज’ या खेळाशी निगडित चित्रपटाची निर्मिती करणारे आनंद एल. राय यांच्याकडे आहेत. कोणता अभिनेता ‘ए बायोपिक ऑन इंडियन चेस ग्रँडमास्टर विश्वनाथन’ या अनटायटल्ड बायोपिकमध्ये जगज्जेत्या बुद्धिबळपटूची भूमिका साकारणार हे अद्याप कळलेले नाही.

भारताचा पहिला ग्रँडमास्टर ते जगज्जेतेपदापर्यंतचा प्रवास, जगज्जेतेपदासाठीच्या थरारक लढती तसेच बुद्धिबळातील राजकारण हे या चित्रपटातील मुख्य मुद्दे असणार आहेत. पाच वेळा विश्वविजेता ठरलेल्या विश्वनाथन आनंदने 11 डिसेंबर रोजी आपला 51 वा वाढदिवस साजरा केला. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आनंदने शुक्रवारी चाहत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद मानले. मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे खूप धन्यवाद. माझा माझ्या कुटुंबासोबत शांत दिवस गेला. अर्थात यात चॉकलेट केक (अरुणा आणि अखिल यांनी बनविलेले) देखील सहभागी असल्याचे ट्विट विश्वनाथन आनंदने केले होते.