शुक्रवारी हृदयविकाराचा झटका प्रसिद्ध कोरिओग्राफर, दिग्दर्शक रेमो डिसूझा याला आला होता. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात रेमोला दाखल करण्यात आले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. रेमो यांच्या चाहत्यांमध्ये या बातमीनंतर चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, त्याच्या प्रकृतीबाबत पत्नी लिझेलने माहिती दिली आहे. रेमोच्या प्रकृतीमध्ये सुधारणा असून तो सध्या ठिक असल्याचे लिझेल म्हणाल्या. तसेच रुग्णालयातून रेमोला कधी डिस्चार्ज देण्यात येणार? याबाबत उद्या डॉक्टर निर्णय घेणार असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत.
रेमो डिसूझा याच्या प्रकृतीबाबत त्याच्या पत्नीने दिली अपडेट
दरम्यान, बॉलिवूड कोरिओग्राफर धर्मेश, कृति महेश आणि अभिनेता आमिर अली रेमो यांच्या तब्यतेची चौकशी करण्यासाठी कोकिलाबेन रुग्णालयात गेले होते. रेमोची प्रकृती आता स्थिर असल्याचे धर्मेश म्हणाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेमो याच्या हृदयातील ब्लॉकेजेस काढण्यासाठी त्याच्यावर एंजियोप्लास्टी करण्यात आली आहे. त्यानंतर निगराणीसाठी त्याला आयसीयूत ठेवण्यात आले आहे.
रेमो यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे समजताच त्याच्या अनेक चाहत्यांमध्ये चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे. तसेच त्यांच्या तब्येतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करु लागले. त्याचबरोबर शक्ती मोहन, अदनान सामी, उर्वशी रौतेला आणि गुरु रंधावा यांच्या समवेत अन्य सेलिब्रिटींनी रेमोच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी शुभेच्छा देणारे ट्विट केले होते.