लालूप्रसाद यादव यांची परिस्थिती चिंताजनक; किडनी फक्त 25 टक्केच कार्यरत


नवी दिल्ली – सध्या रांची येथील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरलेले लालूप्रसाद यादव यांच्यावर उपचार सुरु आहेत. आता त्यांच्या संदर्भात त्यांच्यावर उपचार करत असलेले डॉक्टर उमेश प्रसाद यांनी मोठी आणि महत्वाची माहिती दिली आहे. डॉ. उमेश प्रसाद यांच्या म्हणण्यानुसार फक्त 25 टक्केच लालू प्रसाद यादव यांची किडनी कार्यरत आहे.

त्याचबरोबर त्यांची परिस्थिती पुढील दिवसांमध्ये आणखी बिकट होऊ शकेल. मधुमेह आणि मूत्रपिंडाचा लालूप्रसाद यादव यांना आजार आहे. डॉ. उमेश प्रसाद म्हणाले की, यादव यांच्या मूत्रपिंडाचे कार्य कधी बिघडेल हे सांगणे कठीण आहे. त्यांची स्थिती ठीक नाही आणि त्यांनी हे सर्व लिखित स्वरूपात अधिकाऱ्यांना दिले आहे.

फक्त 25 टक्केच लालू प्रसाद यादव यांचे मूत्रपिंड कार्यरत असल्याची माहिती उमेश प्रसाद यांनी शनिवारी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली. ही परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे त्यांच्या मूत्रपिंडाचे कार्य अचानक थांबू शकते. येत्या 2-4 महिन्यांत हे होऊ शकते, पण ते कधी हे अचूक सांगणे अवघड असल्याचे डॉक्टर म्हणाले. पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास त्यांना डायलिसिस ठेवण्याची आवश्यकता भासू शकते.

डॉक्टर पुढे म्हणाले, त्यांचा आजार ज्या वेगाने वाढत आहे ते चिंताजनक आहे. 20 वर्षांपासून त्यांना मधुमेहदेखील असल्यामुळे आतल्या अवयवाचे नुकसान होण्यास आधीच सुरुवात झाली आहे. आत्ता त्यांना खूप काळजी घेण्याची गरज आहे.