संयुक्त राष्ट्रांच्या समितीची दहशतवाद्याला खर्चासाठी दर महिना दीड लाख रुपये देण्यास मंजुरी


नवी दिल्ली – देण्यास संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या समितीने २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या झकीऊर रेहमान लखवीला प्रती महिना खर्चासाठी दीड लाख रुपये देण्यास मंजुरी दिली आहे. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा लखवी हा ऑपरेशन प्रमुखदेखील आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या मंजूर समितीने पाकिस्तान सरकारने केलेल्या विनंतीनंतर हा निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती असल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लखवीला खर्चासाठी देण्यात येणाऱ्या दरमाह दीड लाख रुपयांमध्ये जेवणासाठी (५० हजार), औषधांसाठी (४५ हजार), सार्वजनिक गोष्टींचा वापर करण्यासाठी (२० हजार), वकिलांचे मानधन देण्यासाठी (२० हजार) आणि वाहतूक (१५ हजार) यांचा समावेश आहे.

लखवीचा मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करण्यात आला होता. तो २०१५ पासून जामीनावर बाहेर आहे. त्याला पाकिस्तानी जेमलध्ये फक्त दाखवण्यापुरते ठेवण्यात आले होते. कारण तो रावळपिंडीमधील अदियाला जेलमध्ये असतानाही एका मुलाचा बाप झाला होता.

याशिवाय संयुक्त राष्ट्राने अणुशास्त्रज्ञ मोहम्मद सुलतान बशीरुद्दीन यांनाही प्रतीमहिना पैसे देण्याची विनंती मान्य केली आहे. दीड लाख रुपये त्यांनाही महिना दिले जाणार आहेत. अफगाणिस्तानात लादेनची भेट पाकिस्तानच्या अॅटोमिक एनर्जी कमिशनसाठी काम केलेल्या बशीरुद्दीन यांनी घेतली होती. त्यांना नवाज शरीफ सरकारने सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते.