राजनाथ सिंह यांच्या चीनला कोपरखळ्या


नवी दिल्ली: देशांनी विवेक, सामोपचार आणि सौजन्याची भूमिका घेऊन भविष्यातील संभाव्य संघर्ष टाळण्याबाबत कटाक्ष ठेवावा, अशा शब्दात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीनचा उल्लेख न करता ड्रॅगनच्या विस्तारवादी आक्रमक भूमिकेला कोपरखळ्या मारल्या.

आसियान देशांच्या संरक्षणमंत्र्यांच्या दूरभाष्य परिषदेमध्ये ते बोलत होते. या परिषदेला चीनचे संरक्षणमंत्री वी फेंग हे देखील सहभागी झाले आहेत.

देशांतर्गत करारांच्या आणि समझोत्यांच्या भंगामुळे संघर्ष, सागरी सुरक्षा, सायबर गुन्हेगारी, दहशतवाद अशा अनेक समस्या आणि आव्हाने या बाबत चर्चा करण्यासाठी या परिषदेसारख्या व्यासपीठांचा उपयोग केला जावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

एकमेकांशी सौजन्यपूर्ण वर्तणुकीने परस्पर सौहार्द, विश्वास प्रस्थापित करणे, संभाव्य संघर्ष टाळणे, प्रादेशिक शांतता कायम राखणे यावर सहभागी देशांनी भर देणे अपेक्षित आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले. आंतरराष्ट्रीय करार आणि नियमांचे पालन, परस्परांच्या सार्वभौमत्वाचा सन्मान राखून वादांवर संवादातून मार्ग काढणे यासाठी भारत कटिबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. दहशतवादाला पाठींबा देत असल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानलाही फैलावर घेतले.