नवी दिल्ली – हिना नागराजन यांची भारतातील सर्वात मोठी मद्यनिर्मिती कंपनी युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची माहिती कंपनीने गुरूवारी दिली. आनंद कृपालू हे सध्या या पदावर कार्यरत आहेत. आता हिना नागराजन या आनंद कृपालू यांची जागा घेणार आहेत. त्या या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला आहेत.
सर्वात मोठ्या मद्यनिर्मिती कंपनीच्या सीईओ पदी पहिल्यांदाच महिला विराजमान
२०१४ मध्ये या कंपनीत आनंद कृपालू हे रूजू झाले होते. युनाटेड स्पिरिट्स लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक पदी ते ३० जून २०२१ पर्यंत कायम राहणार आहेत. १ जुलै २०२१ पासून हिना नागराजन या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे स्वीकारतील, असं कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
आपल्या कार्यकाळात आनंद कृपालू यांनी कंपनीमध्ये अनेक बदल घडवले आणि कंपनीची मोठी प्रगतीही त्यांच्या कार्यकाळात झाली. कंपनीला या दरम्यान मोठा फायदाही झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. सध्या USL ची मूळ कंपनी डियाजिओमध्ये आफ्रिकन बाजार विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून हिना नागराजन या कार्यरत आहे. त्यांनी डियाजिओमध्ये पद सांभाळण्यापूर्वी नेस्ले इंडिया, मॅरी के या कंपन्यांमध्येही व्यवस्थापकीय संचालक पदाची धुरा सांभाळली आहे. त्या २०१८ मध्ये डियाजिओमध्ये रूजू झाल्या होत्या. या ठिकाणी त्यांनी आपएमचे नेतृत्व केले.