नासाच्या मून मिशन मध्ये भारतवंशीय राजा चारी यांची निवड

फोटो साभार दैनिक जागरण

अमेरिकेने चंद्रावर माणूस पाठविण्यासाठी योजलेल्या आर्टेमिस मून मिशन साठी अंतिम १८ अंतराळवीरांची लिस्ट तयार केली आहे. या १८ मध्ये निम्मी संख्या महिला अंतराळवीरांची आहे. या यादीत भारतवंशीय अमेरिकन राजा चारी यांचीही निवड झाली आहे. २०२४ मध्ये ही मोहीम राबविली जाणार आहे.

फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटर मध्ये उपराष्ट्रपती माईक पेन्स यांनी या अंतराळ चमूची ओळख करून दिली. या मिशन मध्ये राजा यांना २०१७ मध्येच टीम मध्ये सामील करून घेतले होते. तेव्हापासून या अंतराळविरांना प्रशिक्षण दिले जात होते.

२०२४ मध्ये चंद्रावर जाणारया या अंतराळ यानातून प्रथम महिला अंतराळवीर चंद्र भूमीवर उतरेल आणि नंतर पुरुष अंतराळवीर उतरेल असे नासाने यापूर्वीच जाहीर केले आहे. दशकांअखेर चंद्रावर एक कायम स्वरूपी तळ उभा करण्याचे ध्येय नासाने ठेवले असून त्यानंतर अंतराळ प्रवास उड्डाण कराराची घोषणा केली जाणार आहे.

भारतवंशीय राजा चारी यांचे वडील हैद्राबाद येथून अमेरिकेत गेले होते. चारी यांचे अनेक नातेवाईक आजही भारतात आहेत. ४३ वर्षीय राजा चारी यांनी अमेरिकेत एअरफोर्स अॅकॅडमी मधून एरोनोटीकल इंजिनीअर पदवी घेतली असून एमआयटी आणि युएस नेव्हल टेस्ट पायलट स्कूल मधून शिक्षण घेतले आहे. यापूर्वी भारतीय वंशाच्या कल्पना चावला आणि सुनिता विलियम्स यांनी नासाच्या अंतराळ मोहिमेत अंतराळवीर म्हणून कामगिरी बजावली आहे. चारी यांचा या यादीत तिसरा क्रमांक आहे.