गांधी कुटुंबाने सोडावी काँग्रेस ; रामचंद्र गुहा यांचे परखड मत


नवी दिल्ली – गांधी कुटुंबाने आता काँग्रेस सोडावी असे परखड मत इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी आपल्या एका लेखामध्ये व्यक्त केले आहे. आपल्या लेखामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये काँग्रेस कधीच भाजपाला पर्याय म्हणून पुढे येऊ शकत नसल्याचेही गुहा यांनी म्हटले आहे. तसेच आपल्या या लेखामध्ये रामचंद्र गुहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा देखील उल्लेख केला आहे. भाजपचे हे तीन प्रमुख नेते एकमेकांशी वैचारिक पातळीवर जोडलेले आहेत. तसेच राजकारण हे या तिघांनाही वारसा म्हणून मिळालेले नाही.

हिंदुत्वावर आधारित राजकारण पुढे घेऊन जाण्याची मोदी, शहा आणि नड्डा या तिघांमध्येही ताकद असून ते सध्या तेच करत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसची परिस्थिती उलट असून तिथे तिन्ही मोठे नेते वैचारिक पातळीवर एकमेकांशी जोडलेले दिसत नाहीत. काँग्रेसचे सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी सर्वात मोठे नेते आहेत कारण त्यांचा संबंध गांधी कुटुंबाशी असल्याचे गुहा यांनी म्हटले आहे. आता गांधींनी जाणे गरजेचे का आहे? असा एक लेख गुहा यांनी लिहिला आहे. त्यांनी आपले रोखठोक मत या लेखात व्यक्त केले आहे.

राहुल गांधी हे राजकारणासंदर्भात किती गंभीर आहेत हे सांगताना गुहा यांनी बिहार निवडणुकीचे उदाहरण दिले आहे. राहुल गांधी निवडणूक प्रचाराच्या काळामध्ये सुट्ट्यांसाठी निघून गेल्याचे म्हटले आहे. राहुल यांच्या या दौऱ्याचा उल्लेख राष्ट्रीय जनता दलाच्या एका नेत्यानेही केल्याची आठवण गुहा यांनी करुन दिली. तसेच याच बाबतीत गुहा यांनी भाजपचे कौतुक केले आहे. काँग्रेसच्या उलट भाजपाने निवडणूक जिंकल्यानंतर लगेच अध्यक्ष असणारे जे. पी. नड्डा हे अशा ठिकाणी दौरा करण्याची घोषणा केली, जिथे पक्षाने वाईट कामगिरी केली असल्याचे आपल्या लेखात म्हटले आहे.

भाजप आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या विचारसरणीमध्ये मोठा फरक आहे. जेवढे टीकाकार काँग्रेसचे नेते आहेत त्याहून अधिक भाजपचे असल्याचे म्हणत त्यांनी मोदी सरकारच्या धोरणांचे विश्लेषण केले आहे. ज्या काँग्रेसचा मी समर्थक होतो, ती महात्मा गांधीची काँग्रेस आहे. देशाला त्या काँग्रेसने स्वातंत्र्य मिळवून देत देशामध्ये धर्मनिरपेक्षतेच्या मुल्यांची जोपासना करण्याला प्राधान्य दिले होते. पण आजची काँग्रेस स्वत:ला स्वयंघोषित धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणवते आणि दुसरीकडे मवाळ हिंदुत्वाचे धोरण अवलंबताना दिसत असल्याचे गुहा यांनी म्हटले आहे.

एकीकडे काँग्रेस आपण उदारमतवादी असल्याचे सांगत त्याचे श्रेय घेते. तर ते दुसऱ्या दिवशी उद्योजकांना विरोध करताना दिसत असल्याचे गुहा यांनी म्हटले आहे. काँग्रेस आणि भाजपच्या नेतृत्वामध्ये तीन मुद्द्यांवरुन खूप मोठा फरक लक्षात येत असल्याचे गुहा यांनी लेखात म्हटले आहे. भाजपचे नेतृत्व हे सेल्फ मेड म्हणजेच स्वत: घडवलेले नेतृत्व आहे. ते वैचारिक स्तरावर एका पातळीवर आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते कोणत्याही मोठ्या कुटुंबातून आले नसल्याचे म्हटले आहे.

अजूनही तीन वर्षे पुढच्या लोकसभा निवडणुकींसाठी बाकी आहेत. काँग्रेसने या कालावधीमध्ये स्वत:ला पुन्हा उभे केले पाहिजे. पक्षबांधणीच्या माध्यमातून भविष्यातील नेतृत्व समोर आणले पाहिजे. इतर विरोधी पक्षांना एकत्र घेऊन आघाडी स्थापन करुन कणखर पर्याय निर्माण केला पाहिजे, असे गुहा यांनी म्हटले आहे. आपल्या लेखात गुहा यांनी स्पष्टपणे गांधी कुटुंबाने केवळ काँग्रेसच्या प्रमुख नेतृत्वावरुनच नाही तर पक्षापासूनच दूर जाण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे.

Loading RSS Feed