रशियाच्या अतिगुप्त लष्करी विमानावर चोरांचा डल्ला

फोटो साभार डेली मेल

रशियन पोलीस सध्या एका खास चोरी केसचा तपास करत आहेत. या चोरांनी रशियाच्या अतिगुप्त आणि अतिमहत्वाच्या लष्करी विमानातील तांत्रिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर डल्ला मारला आहे. इतक्या कडक सुरक्षेतून चोरांनी ही चोरी कशी केली असावी यावर आश्चर्य व्यक्त केले जात असून रशियन सुरक्षा व्यवस्थेवर त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हे विमान ‘डूम्स डे प्लेन ‘ या नावाने ओळखले जाते. शत्रू देशांनी अणुबॉम्ब हल्ला केला तर त्यापासून अध्यक्ष आणि महत्वाच्या लष्करी अधिकाऱ्यांना कोणतीही इजा पोहोचू नये या दृष्टीने या विमानाचे डिझाईन केले गेले आहे. इल्युशिन -११-८० हे जेट विमान मॉडीफाय करून त्याचे अभेद्य अश्या किल्ल्यात रुपांतर केले गेले आहे. रशियाकडे अशी ४ विमाने आहेत पण त्यात हे विमान अति आधुनिक उपकरणांनी सज्ज आहे.

आणीबाणी, युद्ध परिस्थितीत वरिष्ठ रशियन लष्करी अधिकारी या विमानाचा वापर करून युध्द क्षेत्रावर नजर ठेऊ शकतात तसेच युद्धक्षेत्रात तैनात सैनिकांना संदेश देऊ शकतात. या विमानावर अणु बॉम्ब हल्ला झाला तरी आत बसलेल्या लोकांवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. रेडिएशन पासून बचाव व्हावा यासाठी या विमानाला एकाही खिडकी नाही असेही समजते.

या विमानातील उपकरणात सोने आणि प्लॅटीनम या किमती धातूंचा वापर केला गेला होता आणि त्यामुळेच चोरांनी ही उपकरणे चोरली असावीत असा अंदाज आहे. अर्थात हे विमान जुने झाले होते आणि त्याची जागा लवकरच एल्युशन ९६-४०० हे अत्याधुनिक विमान घेणार आहे असेही सांगितले जात आहे.