आशियातील टॉप 50 सेलिब्रिटींच्या यादीत अव्वल स्थानी सोनू सुद


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू झालेल्या लॉकडाऊनपासून ते अद्यापर्यंत बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सतत गरजू लोकांना मदत करत आहे. त्याने लॉकडाऊन दरम्यान अनेकांना जेवण, पैसे दिले. लाखो लोकांना त्यांच्या गावी पोहोचवले तर अनेकांना वैद्यकीय मदतही केली. कोरोना काळात प्रवासी मजुरांसाठी सोनू सूद देवदूत ठरला. त्याने या कामातूनच प्रेरणा घेत लॉकडाऊननंतरही आपले काम अविरत सुरू ठेवले आहे. आता, सोनूच्या कामाची लंडनस्थित एका मॅगझीनने दखल घेतली असून आशियातील टॉप 50 सेलिब्रिटींच्या यादीत तो अव्वल स्थानी आहे.

सोनू सूद लंडनमधील साप्ताहिक वर्तमानपत्र ईस्टन आयने प्रकाशित केलेल्या आशियातील टॉप 50 सेलिब्रिटींच्या यादीत अव्वल स्थानी आहे. 47 वर्षीय सोनू सूदला या स्थानावर विराजमान होण्यासाठी अनेक दिग्गज सेलिब्रिटींशी स्पर्धा करावी लागली. आपल्या कामाच्या माध्यमातून समाजात आपली वेगळी ओळख त्याने निर्माण केली आणि लोकांना प्रेरित केले. या यादीत त्या सेलिब्रिटींचा समावेश करण्यात आला आहे. या सन्मानाबद्दल सोनू सूदनेही आभार व्यक्त करताना आपल्या भावना बोलून दाखवल्या. आपल्या देशातील नागरिकांची मदत करणे हे आपले कर्तव्य असल्याचे मला लॉकडाऊन काळात लक्षात आले.

50 सेलिब्रिटींची यादी ईस्टर्य आयचे संपादक असजद नजीर यांनी तयार केली असून या सन्मानाच्या हक्काचे दावेदार सोनू सूद असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कारण, सोनू सूद एवढे काम लॉकडाऊन काळात इतर कुठल्याही सेलिब्रिटींनी न केल्यामुळे सोनू सूदच्या कार्याला आमचा सलाम असल्याचेही नजीर यांनी म्हटले आहे.