रावसाहेब दानवे यांच्या ‘त्या’ विधानाबद्दल शीख समुदायात संताप


नवी दिल्ली: शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाकिस्तान आणि चीनकडून रसद पुरविली जात असल्याच्या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या विधानावरून शीख समुदाय आणि आंदोलकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दिल्ली शीख गुरुद्वारा मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने आंदोलक शेतकऱ्यांची देशद्रोही आणि अराजकवादी अशी संभावना केल्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

आंदोलक शेतकरी शांतपणे आपले आंदोलन करीत आहेत. सरकारचा त्यांना न्याय देण्यास अक्षम ठरले आहे. शेतकऱ्यांनी देशासाठी अन्न पिकविले आहे. देशासाठी बलिदान दिले आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनीच सैन्यात जाऊन देशाच्या रक्षणासाठी प्राण अर्पण केले आहेत. त्यांच्याबद्दल अशी विधाने करणे हे लज्जास्पद आहे, असे कमिटीचे अध्यक्ष मनजींदरसिंग सिरसा यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओ संदेशात म्हटले आहे.

दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात खऱ्या शेतकऱ्यांचा सहभाग नाही. चीन आणि पाकिस्तान या आंदोलनाच्या पाठीशी आहे. विदेशात शिजलेला कात आहे, असे उद्गार दानवे यांनी जालना येथे एका सभेत बोलताना काढले होते. दिवसांपूर्वी हरयाणाचे कृषिमंत्री जे पी दलाल यांनीही अशाच अर्थाचे विधान केले होते.