आयआरसीटीसीमधील 20 टक्के हिस्सा विकणार मोदी सरकार


नवी दिल्ली : आयआरसीटीसीमधील 20 टक्के हिस्सा विकण्याचा प्रस्ताव केंद्रातील मोदी सरकारने ठेवला आहे. कंपनीमधील आपले 2.4 कोटी शेअर्सची सरकार ऑफर ऑफ सेलद्वारे विक्री करेल. त्याचबरोबर जास्त सबस्क्रिप्शन झाल्यास 80 लाख अतिरिक्त शेअर्सची विक्री करण्याचा प्रस्ताव सरकारने ठेवला आहे.

सरकारचे आयआरसीटीसीमध्ये 3.2 कोटी शेअर आहेत. 10 आणि 11 डिसेंबर 2020 ला स्टॉक एक्सचेंजच्या स्वतंत्र विंडोद्वारे आयआरसीटीसीच्या शेअर्सची विक्री केली जाईल, असे केंद्राने म्हटले आहे. फक्त किरकोळ गुंतवणूकदारांनाच 11 डिसेंबरला शेअर्ससाठी अर्ज करण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचे केंद्राने म्हटले आहे. त्याची फ्लोर किंमत सरकारने 1367 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. आयआरसीटीसीच्या बुधवारी बंद झालेल्या किंमतीपेक्षा 16 टक्के कमी केंद्राने निश्चित केलेली फ्लोर किंमत आहे, म्हणजेच 16 टक्के सवलतीच्या किंमतीसह गुंतवणूक करण्याची संधी गुंतवणूकदारांना मिळेल. दरम्यान, बुधवारी कंपनीचे शेअर्स 1618.05 रुपयांच्या किंमतीवर बंद झाले होते. फेब्रुवारी 2020 मध्ये कंपनीचे शेअर 52 आठवड्यात वाढून 1995 रुपयापर्यंत पोहोचले होते. यानंतर मार्चमध्ये घसरून 74.85 प्रति शेअर रुपयांवर पोहोचले होते.

30 सप्टेंबर 2020 रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीदरम्यान आयआरसीटीसीचा निव्वळ नफा 67.3 टक्क्यांनी घसरून 32.63 कोटी रुपये झाला होता. याच कालावधीत गेल्या वर्षी कंपनीचा निव्वळ नफा 99.82 कोटी होता. तसेच, आयआरसीटीसीच्या आपरेशन्समुळे महसूलमध्ये 83 टक्के घट सप्टेंबर 2020 च्या तिमाहीमध्ये झाली आणि ती 88 कोटी रुपये झाली. कंपनीला गेल्या वर्षी याच कालावधीत आपरेशन्समुळे 533 कोटी रुपयांची कमाई झाली होती. दरम्यान, आयआरसीटीसी ही एक सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे, जी रेल्वे मंत्रालयांतर्गत कार्यरत आहे. ही कंपनी कॅटरिंग सर्व्हिसच्या व्यतिरिक्त ऑनलाइन रेल्वेची तिकिटे आणि बाटली बंद पाणी देखील पुरवते.