वॉशिंग्टन – संपूर्ण जग कोरोना व्हायरसमुळे चिंतेत असून जगभरातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बहुतांश देशांत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तरी देखील कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांचा आकडा वाढतच चालला आहे. तब्बल सहा कोटींचा टप्पा कोरोनाग्रस्तांच्या संख्येने पार केला आहे. या व्हायरसमुळे लाखो लोकांना आपला जीव नाहक गमवावा लागला आहे. अमेरिकेसारखा मोठा देशही कोरोनासमोर हतबल झाला आहे.
तीन महिन्यात जवळपास 10 कोटी नागरिकांना देणार कोरोना प्रतिबंधक लस – जो बायडेन
मृतांचा आकडा महासत्ता असलेल्या अमेरिकेतही वाढताना दिसत आहे. कोरोनाची लागण झालेल्यांची अमेरिकेत संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्या 100 दिवसांत 10 कोटी अमेरिकेच्या नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येईल, अशी महत्त्वाकांक्षी घोषणा अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी केली आहे. तसेच सर्वांसाठी मास्क वापरणे अनिवार्य करण्यात येईल व बहुतांश शाळा पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही म्हटले आहे.
एक आपत्ती निवारण तज्ज्ञांचे पथक आपण नियुक्त केले असून अमेरिकेला आर्थिक संकटातून यातील तज्ज्ञ बाहेर काढतील तसेच, आरोग्यसेवा उंचावण्याचा प्रयत्न करतील, असा विश्वासही बायडेन यांनी व्यक्त केला आहे. यापूर्वी फायझर व मॉडर्ना यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार ट्रम्प प्रशासनाने लसींची खरेदी करण्यास सुरुवात करावी. तसेच, अमेरिकी नागरिक व जगभरातील देशांना या लसी पुरवण्यासाठी आवश्यक उत्पादन करण्याचेही या कंपन्यांना सूचित करावे. या प्रकारे कार्यवाही झाल्यास माझ्या कार्यकाळाच्या पहिल्या 100 दिवसांत 10 कोटी अमेरिकी नागरिकांना कोरोनाची लस देणे शक्य होईल, असे म्हटले आहे.