नवी दिल्ली – ESIC धारक कर्मचाऱ्यांना एम्प्लोईज स्टेट इन्शोसन्स कॉर्पोरेशनने दिलासा दिला असून आपल्या सर्व ग्राहक आणि या योजने अंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व ग्राहकांना आपात्कालिन परिस्थितीत आपल्या जवळच्या कोणत्याही खासगी रुग्णालयात उपचार घेण्याला ईएसआयसीने मंजुरी दिली आहे. ईएसआयसीच्या ग्राहकांना यापूर्वी त्यांच्या नजीकच्या डिस्पेंन्सरी अथवा रुग्णालयात जावे लागत होते. तसेच खासगी रुग्णालयात उपचारांसाठी रेफरल आणावे लागत होते.
ESIC धारक कर्मचाऱ्यांना आता खासगी रुग्णालयांमध्येही करता येणार उपचार
आपात्कालिन परिस्थिती ईएसआयसी रुग्णालयात किंवा डिस्पेन्सरीमध्ये जाऊन रेफरल आणण्याची अट रद्द करण्याचा निर्णय मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. हृदयविकाराचा झटका किंवा कार्डिअॅक अरेस्ट सारख्या आपात्कालिन परिस्थितीत त्वरित रुग्णालयात दाखल करावे लागत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ट्रेड युनियन कोऑर्डिनेशन कमिटीचे सचिव एस.पी. तिवारी यांनी दिली.
आता आपात्कालिन परिस्थितीत ईएसआयसीच्या ग्राहकांना इम्पॅनल्ड आणि नॉन इम्पॅनल्ड कोणत्याही खासगी रुग्णालयात उपचार घेता येणार आहेत. यामध्ये केवळ एकच फरक असेल. इम्पॅनल्ड रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचार केले जाणार आहेत. तर नॉन इम्पॅनल्ड रुग्णालयात सरकारी दरानुसार पैसे रिअँबर्स करण्यात येतील.
दरम्यान, तेव्हाच नॉन इम्पॅनल्ड रुग्णालयात उपचार करता येतील जेव्हा रुग्णाच्या १० किलोमीटर नजीकच्या परिसरात कोणतेही ईएसआयसी अथवा इम्पॅनल्ड रुग्णालये नसतील. आता ज्या रुग्णालयांद्वारे ईएसआयसी आरोग्य सेवा पुरवणार आहे ते स्वत: चालवले जाणार आहेत. राज्यांकडे त्यांची जबाबदारी सोपवण्यात येणार नसल्याचेही तिवारी यांनी सांगितले.
हा निर्णय आरोग्य सेवांची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी घेण्यात आला आहे. ईएसआयसीच्या २६ रुग्णालयांच्या उभारणीचे काम सध्या पूर्ण झाले असून १६ रुग्णालयांच्या उभारणीचा आराखडा तयार आहे. ईएसआयसीचे ११० रुग्णालये सध्या राज्य चालवतात. यासाठी ईएसआयसीकडून सेवा शुल्कही दिले जाते.