नेपाळने केली ‘माऊंट एव्हरेस्ट’च्या नव्या उंचीची अधिकृत घोषणा


काठमांडू – मंगळवारी नेपाळकडून जगातील सर्वात उंच शिखर अशी ओळख असलेल्या माऊंट एव्हरेस्टची नवी उंची जाहीर करण्यात आली. ८,८४८.८६ मीटर एव्हरेस्टची नवी उंची असल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप कुमार ग्यावली यांनी दिली. आधीपेक्षा ०.८६ सेंटीमीटर एवढी माऊंट एव्हरेस्टची उंची वाढली असल्याचीही माहिती ग्यावली यांनी दिली. या शिखराची उंचीच्या मोजमापावर जवळपास वर्षभर काम सुरू होते. त्यानंतर अखेर मंगळवारी नेपाळकडून एव्हरेस्टची नवी उंची अधिकृतपणे जाहीर करण्यात आली.

नेपाळमध्ये २०१५ साली झालेल्या भूकंपामध्ये एव्हरेस्टचा काही भाग खचल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यानंतर ही उंची पुन्हा एकदा मोजण्यासाठी नेपाळ सरकारने काही वर्षांचा कालावधी लागेल, असे स्पष्ट केले होते. हे शिखर भूकंपानंतर काहीसे खचल्याची शक्यता असल्यामुळे पुनर्मोजणीचा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. चीनमधील आणि इतर काही संस्थांनी भूकंपाच्या घटनेनंतर ‘माऊंट एव्हरेस्ट’ची उंची मोजण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यातच नेपाळ सरकारने स्वतः यासाठी पुढाकार घेत चीनसोबत संयुक्तपणे मोजणी करत ही नवी उंची जाहीर केली.