२०० रुपये भाडयाने घेतलेल्या जमिनीमुळे या शेतकऱ्याचे फळफळले नशीब


भोपाळ – कोणाचे नशीब पलटेल यावर कोणीच भाष्य करु शकत नाही. असेच काहीसे मध्य प्रदेशामधील शेतकरी लखन यादव याच्यासोबत घडले आहे. नशीबाने अशी काही साथ लखन यादवला दिली की, ज्यामुळे लखन आज लखपती झाला आहे. हिऱ्यांसाठी मध्य प्रदेशातील पन्ना हे ठिकाण प्रसिद्ध असून येथील खाणींमध्ये हिरे सापडतात. लखन यादव या शेतकऱ्याने मागच्या महिन्यात पन्नामध्ये २०० रुपये भाडयावर १० बाय १० जमिनीचा एक छोटा तुकडा भाड्याने घेतला होता. त्याला तिथे खोदकाम करताना १४.९८ कॅरेटचा हिरा सापडला.

माझे आयुष्यच त्या हिऱ्याने बदलून टाकले असून मी कधीच हिरा नजेरला पडला तो, क्षण विसरु शकत नाही. दगडांमध्ये विलक्षण चमकणारी एक वेगळी वस्तू खोदकाम करताना दिसली, असे लखन यादवने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले. लखन यादव लखपती झाल्यानंतर आता कसे वाटते? या प्रश्नावर म्हणाले की, मी काही तरी मोठे मिळेल म्हणून गेलो नव्हतो. माझे शिक्षण झालेले नाही. माझ्या चार मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. हे पैसे त्यासाठी मी फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवणार आहे.

पन्ना नॅशनल पार्कमधून गाव हटवण्यात आली, त्यामध्ये लखन यादवच्या गावाचाही समावेश होता. त्याला भरपाई म्हणून जे पैसे मिळाले, त्यातून त्याने दोन हेक्टर जमीन, दोन म्हशी विकत घेतल्या. हिरा सापडल्यानंतर त्याला तो जिल्हा प्रशासनाकडे जमा करावा लागला. त्यावेळी त्याला एक लाख रुपये मिळाले, त्यातून त्याने बाईक विकत घेतली. खोदकामासाठी जी जमीन लखन यादवने भाडयावर घेतली, तिथे तो पुन्हा खोदकाम सुरु करणार आहे. तिथे आणखी एखादा हिरा सापडू शकतो, असे त्याला वाटते. लखन यादवला पन्नाच्या खाणीत सापडलेला हिरा शनिवारी लिलावामध्ये ६०.६ लाख रुपयांना विकला गेला.