१२६३८ हिरे जडवून बनलेल्या अंगठीची गिनीज बुक मध्ये नोंद

फोटो साभार न्यूज बस्ट

सुरत ही भारताची हिरे नगरी मानली जाते. याच शहरातून हिरे दागिने डिझाईनचे प्रशिक्षण घेतलेल्या मेरठ येथील २५ वर्षीय सराफ हर्षित बन्सल यांनी तब्बल १२६३८ हिरे जडवून बनविलेल्या अंगठीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जगातील सर्वात मोठी हिऱ्याची अंगठी अशी नोंद केली गेली आहे.

ही अप्रतिम अंगठी झेंडूच्या फुलाच्या आकारात असून तिचे नाव ‘ मेरीगोल्ड, द रिंग ऑफ प्रोस्पेरिटी’ असे आहे. ही सर्वाधिक वजनाची अंगठी सुद्धा बनली आहे. हर्षित यांना अशी अंगठी बनविण्याची कल्पना सुरत मध्ये वेस्टर्न सिटी ज्युवेलरी डिझाईन मध्ये शिक्षण घेत असतानाचा सुचली होती. त्यांना ही अंगठी बनविण्यासाठी दोन वर्षे लागली. प्रथम त्यांनी १० हजार हिरे जडवून अंगठी बनविली होती पण पुन्हा डिझाईन बनवून १२६३८ हिरे जडवून ही अंगठी साकारली. ही अंगठी त्यांच्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट आहे.

बडे बडे सराफ हर्षित कडून ही अंगठी ‘मुंह मांगे दाम’ म्हणजे मागाल त्या किमतीला खरेदी करण्यास तयार आहेत मात्र हर्षित यांना अंगठी विकायची नाही. ही अंगठी बनविताना त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे आणि त्यामुळे त्यांना अंगठी स्वतःजवळ ठेवण्याची इच्छा आहे. यापूर्वी जगातील सर्वात मोठी हिरे अंगठी नोंदविण्याचे रेकॉर्ड भारतीयाच्याच नावावर असून त्या अंगठीत ७८०१ हिरे जडविले गेले होते.