चंद्रकांत पाटलांनी आगीत तेल ओतण्याचे काम करुन नये – हसन मुश्रीफ


कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषि विधेयकात कोणताही बदल होणार नसल्याचे म्हणणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देशाचे पंतप्रधान आहेत की कृषिमंत्री? असा सवाल करत ते मुद्दामहून आगीत तेल ओतण्याचे काम करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

केंद्र सरकारच्या नव्या कृषि विधेयकाविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. संसदेत केंद्र सरकारने आणलेले तीन कृषि विधयके रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. याबाबत सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून कोणताही निर्णय होत नसल्यामुळे शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे.

महाविकास आघाडीचा या बंदला पाठिंबा असल्याचे सांगत राज्यातील जनतेने अत्यावश्यक सेवा वगळून कडकडीत बंद पाळावा. तसेच, शांततेत हा बंद पार पाडण्याचे आवाहन हसन मुश्रीफ यांनी केला आहे. त्याचबरोबर कोणताही बदल केंद्र सरकारच्या कृषि विधेयक होणार नसल्याचे सांगणारे चंद्रकांत पाटील हे देशाचे पंतप्रधान आहेत की कृषिमंत्री? असा सवाल करत ते मुद्दाम आगीत तेल ओतत असल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला.

याचबरोबर, महाराष्ट्रात आंदोलनाला तीव्रता नसल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पण मुळात महाराष्ट्रात उसाला एफआरपी आहे, कापूस, तूर व इतर उत्पादनांना हमीभाव आहे आणि या संदर्भातील कायदे शरद पवार कृषिमंत्री असताना केलेले असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

दरम्यान, कृषि विधेयक रद्द करण्यास विरोध करून भाजप हा शेतकरी हिताविरुद्ध पक्ष असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सिद्ध केल्याचा टोला गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी लगावला आहे. सतेज पाटील म्हणाले, सर्वांनी उद्या या बंदला पाठिंबा देण्यासाठी आपल्या घरासमोर काळा झेंडा लावा. माझा काय संबंध असे न म्हणता प्रत्येकाने बंदमध्ये सहभागी व्हावे. हा विधेयक बदलणार नाही अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडली असून याचा अर्थ भाजप शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचे स्पष्ट होते.