‘भारत बंद’ला पाठिंबा देणाऱ्या महाविकास आघाडीवर सुधीर मुनगंटीवारांची टीका


मुंबई: केंद्र सरकारच्या नव्या कृषि विधेयकाविरोधातील शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळले असून शेतकरी संघटनेकडून उद्या ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली आहे. याचदरम्यान राज्यातील महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाआघाडीच्या या भूमिकेवर कडाडून टीका केली आहे.

मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीची भूमिका आश्चर्यकारक असल्याचे म्हटले आहे. देशातील निवडणुकांमध्ये जे राजकीय पक्ष सातत्याने पराभूत होत आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना कृषिकारण नव्हे, तर राजकारण करायचे आहे. शेतकऱ्यांच्या हिताची त्यांना चिंता नाही. आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या भविष्याची त्यांना चिंता असून त्यांच्यासाठी शेतकऱ्यांचं भविष्य गौण असल्याची टीका मुनगंटीवार यांनी कोणाचेही नाव न घेता केली. या संदर्भातील वृत्त एबीपी माझाने दिले आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीची महाराष्ट्रात ४७ वर्षे, दोन महिने, एक दिवस सत्ता होती. शिवसेनेसोबतच एक वर्ष जमेस धरल्यास हा आकडा ४७ वर्षे, दोन महिने, एक दिवस एवढा होतो. दुसरीकडे, ५२ वर्षांहून अधिक काळ देशात काँग्रेसची सत्ता होती. मग असे काय झाले की ज्या कृषि क्षेत्राला आपण उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी म्हणायचो, त्याची व्याख्या का बदलली? याचे कधी चिंतन केले आहे का?, असा सवाल त्यांनी केला.

मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पत्र व शिवसेनेच्या आधीच्या भूमिकांच्या अनुषंगानेही भाष्य केले. काही राजकीय पक्षांना आज राजकीय विस्मरणाचा आजार झाला आहे. ज्याला ‘पोलिटिकल अल्झायमर’ म्हणता येईल, असे म्हणत त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना टोला हाणला.