अक्षयने आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आदित्यनाथ यांच्याकडे मागितली परवानगी


आपल्या आगामी ‘रामसेतु’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अभिनेता अक्षय कुमारने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे इच्छा व्यक्त करत परवानगी मागितली आहे. अक्षय आदित्यनाथ यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर अयोध्यामध्ये आपल्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करणार आहे. सरकारी प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री अक्षय कुमार आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बैठक झाली होती.

अक्षय कुमारने या बैठकीमध्ये चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशात फिल्म सिटी सुरू करण्याच्या निर्णयाबद्दल अक्षय कुमारने आनंद व्यक्त केला. दरम्यान, योगी आदित्यनाथ यांनी अक्षय साकारत असलेल्या सामाजिक चित्रपटाचे कौतुक देखील केले. शिवाय अक्षयने योगी आदित्यनाथ सरकारने उत्तर प्रदेशात चित्रपट निर्मितीला चालना देण्यासाठी घेतलेल्या पुढाकारासाठी त्यांचे आभार मानले. त्यातच आता अक्षयला त्याच्या आगामी चित्रपटासाठी उत्तर प्रदेश सरकार परवानगी देणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.