ईडीचा विजय माल्ल्याला जोरदार झटका; फ्रान्समधील १४ कोटींची मालमत्ता जप्त


मुंबई : भारतीय बँकांना चूना लावून फरार झालेला लिकरकिंग विजय माल्ल्याला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)जोरदार झटका दिला असून फ्रान्समधील विजय माल्ल्याची १४ कोटींची मालमत्ता ईडीने जप्त करण्यास भाग पाडले आहे. फ्रेंच अधिकाऱ्यांनी ही मालमत्ता ईडीच्या सांगण्यावरुन जप्त केली आहे.

विजय माल्ल्याने स्टेट बँकेसह भारतातील इतर बँकांचे जवळपास नऊ हजार कोटी रुपये बुडवून फरार झाला आहे. आता फ्रान्समधील विजय माल्ल्याची मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे. ही मालमत्ता युरो १.६ मिलियन अर्थात सुमारे १४ कोटींची आहे. फ्रान्समधील तपास यंत्रणांने ही कारवाई केल्यानंतर याबाबतची माहिती दिली. दरम्यान, या वृत्ताला ईडीनेही दुजोरा दिला आहे. फ्रान्समधील तपास यंत्रणांना विजय माल्ल्याची मालमत्ता जप्त करण्याबाबत आम्ही सांगितले होते. त्यानंतर ही कारवाई त्यांनी केल्याचे ईडीकडून सांगण्यात आले आहे.

जानेवारी २०१९ मध्ये मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट अंतर्गत न्यायालयाने विजय माल्ल्याला फरार आरोपी घोषित केले. तो मार्च २०१९ पासून लंडनमध्ये वास्तव्य करीत आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताकडून प्रयत्न सुरु आहेत. विजय माल्ल्याच्या प्रत्यार्पणासंदर्भातील खटला ब्रिटनमध्ये सुरु आहे. याआधी न्यायालयाने त्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली होती. पण विजय माल्ल्याच्या वकिलांनी या निर्णयाला आव्हान दिले.

तसेच ब्रिटन सरकारला शरणार्थी म्हणून आश्रय देण्याचीही विजय माल्ल्याने विनंती केली. याप्रकरणी भारत सरकारने विशेष बाब म्हणून प्रत्यार्पण मंजूर करावे अशी विनंती केली आहे. विजय माल्याच्या किंगफिशर एअरलाइन्सला बँकांच्या समूहाकडून सुमारे ७ हजार कोटींचे कर्ज देण्यात आले होते. व्याज आणि दंड यांची रक्कम मिळून १२ हजार कोटींचा कर्जाचा डोंगर आहे.