दुखापतग्रस्त रवींद्र जडेजा टी-२० मालिकेतून बाहेर


कॅनबेरा – टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेच्या दुसऱ्या सामन्याआधीच मोठा धक्का बसला असून पहिल्या टी-२० सामन्यात टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याला उर्वरित दोन सामन्यांना मुकावे लागणार आहे. आता त्याच्या जागी मराळमोळा गोलंदाज शार्दुल ठाकूरचा संघात समावेश करण्यात आला आहे.

टीम इंडियाला पहिल्या टी-२० सामन्यांत जडेजाच्या दमदार कामगिरीच्या जोरावर १६१ धावांपर्यंत मजल मारता आली होती. तर जडेजाने शेवटच्या एकदिवसीय सामन्यातही जबरदस्त खेळी करत टीम इंडियाच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते. रवींद्र जडेजाच्या पायाला कॅनबेरावर झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात दुखापत झाल्यामुळे दुसऱ्या इनिंगमध्ये जडेजाला संघाबाहेर बसावे लागले होते. त्यामुळे युजवेंद्र चहल याला जडेजाच्या जागी संधी मिळाली आणि त्याने संधीचे सोने करत कांगारुंच्या तीन फलंदाजांना माघारी धाडले. पण बदली खेळाडूच्या मुद्द्यावरुन वाद देखील सुरु झाला आहे. रवींद्र जडेजा सध्या बीसीसीआयच्या मेडिकल टीमच्या देखरेखी खाली असून उर्वरित दोन टी-२० सामन्यांसाठी तो उपलब्ध होणार नसल्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे.