महाविकास आघाडीच्या विजयानंतर रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल


मुंबई – अनपेक्षितपणे भाजपला विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदार निवडणूकीत मोठा फटका बसला असून भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या नागपूर आणि पुणे या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तब्बल २० वर्षांनंतर पुणे मतदारसंघात भाजपला पराभवाचे तोंड पाहवे लागले आहे. भाजपाला नेहमी साथ देणाऱ्या पुणेकर मतदारांनी यंदा मत राष्ट्रवादीच्या पारड्यात टाकून भाजपाच्या गडाला खिंडार पाडले आहे. दरम्यान, यानंतर विरोधकांवर राष्ट्रवादी नेते रोहित पवार यांनी जोरदार निशाणा साधला.


भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असली तरी महाविकास आघाडीसाठी निष्ठेची होती. राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस व शिवसेनेसह सहयोगी पक्षांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी एकमेकांबद्दल दाखवलेली निष्ठाच आज कामी आली. या निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीची मनातील जागा कायम ठेऊन भाजपला त्यांची ‘जागा’ दाखवून दिली,” अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.


भाजपचे म्हणवल्या जाणाऱ्या नागपूर, पुण्यासारख्या बुरुजालाही सुरुंग लावत इथं #महाविकासआघाडीने विजयाचा झेंडा रोवला. त्यामुळं आतातरी @BJP4Maharashtra ने खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष म्हणून प्रामाणिकपणे काम करण्यास सुरुवात करायला हरकत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुणे पदवीधर मतदार संघात एक लाख २२ हजार १४५ अशी सर्वाधिक मते घेत महाविकास आघाडीचे अरुण लाड विजयी झाले आहेत. भाजपच्या संग्राम देशमुख यांना ७३ हजार ३२१ मते पडली आहेत. विजयासाठी एक लाख १५ हजार मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता.