निवडणुकींच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनाला टोला


मुंबई – काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेच्या महाविकास आघाडीला विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत झालेल्या निवडणुकांमध्ये मोठे यश मिळाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ तर काँग्रेसच्या एका उमेदवाराच्या विजयासह महाविकास आघाडीच्या उमेदवाराने ६ पैकी ५ जागा जिंकल्या. तर धुळे-नंदुरबारची एकमेव जागा भाजपला मिळाली. महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी नागपूर, पुणे, औरंगाबाद यासाख्या भाजपच्या प्रतिष्ठेच्या पदवीधर मतदारसंघांमध्ये विजय मिळवल्यामुळे भाजपासाठी हा धक्का मानला जात आहे. असे असताना शिवसेनेलाच आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

भाजपाचा किमान एकतरी उमेदवार नुकत्याच झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झाला. पण शिवसेनेच्या हाती काहीही लागले नाही. या निवडणुकीत त्यांचा एकही उमेदवार जिंकलेला नाही. तीन पक्ष एकत्र आल्यानंतर त्यांच्या शक्तीचा अंदाज आम्हाला आला नाही हे खरे. पण या तीन पक्षातील केवळ दोघांनाच या निवडणुकीचा फायदा झाला आणि एका पक्षाला एकही जागा मिळालेली नाही. राज्यात ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांच्या शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही ही गंभीर बाब असून त्यांनी याचे आता आत्मचिंतन करावे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.