भारतीय वंशाच्या नेत्याकडे जो बायडन यांच्या शपथविधी कार्यक्रमाची जबाबदारी


वॉशिंग्टन – नव्या वर्षात २० जानेवारी २०२१ रोजी अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून जो बायडन, तर कमला हॅरिस या उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. जो बायडन यांनी शपथविधीच्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ‘प्रेसिडेंशिअल इनॉग्रल कमिटी’ची नियुक्ती केली आहे. भारतीय वंशाच्या माजू वर्गीज यांची या चार सदस्यीय समितीत निवड करण्यात आली आहे.

माजू वर्गीज हे वकील असून अमेरिकेत त्यांचा जन्म झाला होता. केरळमधील तिरुवल्लामधून वर्गीज यांचे आई-वडील अमेरिकेत स्थायिक झाले होते. कार्यकारी संचालक माजू वर्गीज यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी टोनी अॅलन, उप कार्यकारी संचालक एरिन विल्सन आणि युवाना कॅन्सेला यांचा अमेरिकेच्या नव्या अध्यक्षांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाची जबाबदारी देण्यात आलेल्या समितीत समावेश आहे.

माझा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या शपथविधी सोहळ्याचं नियोजन करण्यासाठीच्या समितीमध्ये समावेश होणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. शपथविधीचे आयोजन अमेरिकेतील नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचणार नाही अशा स्वरुपात केले जाईल. यासोबतच अमेरिकेचे सामर्थ्य दाखवून दिले जाईल, असे वर्गीज यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

वर्गीज पुढे म्हणाले, जो बायडन आणि कमला हॅरिस यांच्या ऐतिहासिक शपथविधीनंतर कोरोना विरोधात काम सुरू करणे आणि अर्थव्यवस्थेच्या स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी जोमाने कामाला सुरुवात होईल. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत जो बायडन आणि कमला हॅरिस यांच्या प्रचार अभियानाचे मुख्य संयोजक म्हणून माजू वर्गीज यांनी काम पाहिले आहे.