रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधनात अडकल्या उर्मिला मातोंडकर


मुंबई: काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवल्यानंतर काँग्रेसला काही दिवसांतच सोडचिठ्ठी देणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत आज जाहीर प्रवेश केला. पक्षात त्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले.

शिवसेनेने उर्मिला यांना विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त जागेवर उमेदवारी दिली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वत: त्यांच्याशी ही उमेदवारी देताना चर्चा केली होती. त्यानंतर उर्मिला यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. कालच दरम्यान या चर्चेला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दुजारो दिला होता. त्यानुसार उर्मिला आज दुपारी मुख्यमंत्र्यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी पोहोचल्या. त्यांनी तिथे शिवसेनेत प्रवेश केला. उर्मिला यांच्या हाती रश्मी ठाकरे यांनी शिवबंधन बांधले. उर्मिला यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व मीनाताई ठाकरे यांच्या तसबिरीला नमस्कार केला.


उर्मिला यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांना भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली होती. त्यांचा या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून काँग्रेसला रामराम ठोकला. पण लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात त्यांची भाषणे, मुलाखती यातून त्यांची राजकीय समज व सामाजिक प्रश्नांविषयी असलेल्या त्यांच्या आकलनाची चुणूक दिसली होती. त्याचबरोबर त्यांनी अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबई, मुंबई पोलीस व बॉलिवूडबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याला उत्तर दिल्यामुळे अलीकडेच त्या पुन्हा चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर विधान परिषदेसाठी त्यांच्या नावाची शिवसेनेने शिफारस केली होती.