जय जवान गोविंदा पथकाच्या प्रशिक्षकाला तडीपारीची नोटीस


मुंबई: राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दहीहंडीचा उत्सवाला जोगेश्वरीतील जय जवान गोविंदा पथकाच्या माध्यमातून ख्याती मिळवून देणारे प्रशिक्षक संदीप ढवळे यांना वर्षभरासाठी तडीपार घोषित करण्यात आले आहे. ही तडीपारीची नोटीस बजावण्यात आल्याचे ढवळे याचे म्हणणे आहे.

अन्य एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण करत असताना त्याला वाचवण्यासाठी मी पुढे आलो. समोरील गटाकडून त्यावेळी झालेल्या हल्ल्याला प्रतिकार करताना काही जण किरकोळ जखमी झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे काही काळ तुरुंगातही राहावे लागले. त्यानंतर न्यायालयाने माझी जामिनावर सुटका केली. पोलीस चौकीत त्यानंतर हजेरी देखील लावली. पण राजकीय दबावाखाली पोलीस यंत्रणेचा वापर करून तडीपारीची नोटीस बजावल्याचे ढवळे यांचे म्हणणे आहे. सोशल मीडियावर संदीप ढवळे याची ही पोस्ट व्हायरल झाली आहे.

नमस्कार मी संदिप भरत ढवळे. आपल्यातले बरेच जण मला ओळखत असतीलच. गेली २० वर्षाहून अधिक काळ मी दही हंडीसाठी समर्पीत राहून…

Posted by Sandeep Dhawale on Monday, 30 November 2020

माझ्यावर समाजामध्ये दहशत निर्माण करत असून, दुकानदारांकडे खंडणी मागत आहे, असे खोटे आरोप होत असल्याचे ढवळे यांचे म्हणणे आहे. माझे कुटुंब या सर्व प्रकरणामुळे दबावाखाली असून, माझ्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी कोण घेईल, असा सवाल त्याने उपस्थित केला आहे. ही कारवाई माझी चूक नसताना केली जात आहे. ही कारवाई अन्यायकारक आहे, असे ढवळे याचे म्हणणे आहे. मराठी तरूण असेच तडीपार होवोत आणि देशोधडीला लागोत, अशी व्यथाही त्याने मांडली.

मुंबईतील जोगेश्वरी येथील जय जवान गोविंदा पथकाचे संदीप ढवळे हे प्रशिक्षक आहेत. मी आणि माझ्या पथकातील खेळाडूंनी २६ जुलैचा मुंबईतील महापूर, सातारा-सांगलीतील पूर, कोकणातील चक्रीवादळ आणि करोना काळात संकटात सापडलेल्यांना जीवाची पर्वा न करतामदत केली आहे. पण मला विनाकारण एका प्रकरणात गोवण्यात आले असून एखाद्या सराईत गुंडासारखी वागणूक दिली जात असल्याचे ढवळे यांचे म्हणणे आहे.