मतदार यादीतून गायब झाले अभिजीत बिचुकलेंचे नाव


साताराः आज विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांची निवडणूक राज्यात पार पडत असून बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले हे देखील या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले आहेत. पण मतदार यादीतून चक्क बिचुकले यांचे नावच गायब झाले आहे. बिचुकले यांनी नाव मतदार यादीतून गायब झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.

पुणे विभाग पदवीधर मतदार संघासाठी अभिजित बिचुकले यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. बिचुकले यांचे नाव आज मतदानाच्या दिवशीच मतदार यादीतून गायब झाले आहे. मतदान यादीत नाव नसल्याचे बिचुकले यांना कळताच मतदान केंद्रावर गोंधळ घातला असून प्रशासनाच्या कारभारावर टीकेची झोड उठवली आहे. साताऱ्यातील मतदान केंद्रावर बिचुकले गेले असता, त्यांना झालेला प्रकार लक्षात आला. पत्नी अलंकृता बिचुकले यांचे नाव मतदान यादीत होते, पण या यादीत अभिजीत बिचुकलेंच्या जागी नारायण बिचुकले अशा दुसऱ्याच व्यक्तीचे नाव होते.