पंकजा मुंडे झाल्या ‘आयसोलेट’; ट्विटच्या माध्यमातून दिली माहिती


बीड – आज राज्यातील विधानपरिषदेच्या ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघासाठी मतदान पार पडत असतानाच भाजप नेत्या पंकजा मुंडे या मतदानापूर्वी आयसोलेट झाल्या आहेत. रात्री उशिरा पंकडा मुंडे यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. पंकजा मुंडे या राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या.


पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्याला आव्हान करते की आपण शिरीषजी बोराळकर यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करावे. मला सर्दी खोकला व ताप आहे त्यामुळे मी जवाबदारी स्वीकारून आयसोलेट झाले आहे. अर्थाचे अनर्थ करणाऱ्याकडे दुर्लक्ष करावे आणि बोराळकरांच्या पारड्यात पहिली पसंती टाकावी, असे पंकजा मुंडे आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत.

रात्री ११.३१ च्या सुमारास ट्विट करत पंकजा मुंडे यांनी ही माहिती दिली. सर्दी, खोकला, ताप ही सर्व कोरोनाची लक्षण आहेत. पंकजा मुंडेंना ही सर्व लक्षण जाणवू लागल्याने त्यांनी स्वत:ला आयसोलेट केले आहे. पण त्यांना अद्याप कोरोनाची लागण झाली आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.