चिंता वाढवणारी बातमी; नाकावाटे मेंदूत शिरकाव करू शकतो कोरोना


बर्लिन – संपूर्ण जगावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्याप कायम असतानाच या महामारीच्या लक्षणांमध्ये अनेक बदल होताना दिसत असून, आता चिंता वाढवणारी माहिती एका नव्या अभ्यासातून समोर आली आहे. नाकावाटे कोरोना विषाणू मेंदूत शिरकाव करू शकतात, अशी भीती एका संशोधनानंतर व्यक्त करण्यात आली आहे.

नेचर न्युरोसायन्स या जर्नलमध्ये जर्मनीमधील बर्लिन येथील चारिटे युनिर्व्हसिटी मेडिसीन संस्थेने केलेल्या संशोधनाचा अहवाल प्रकाशित झाला आहे. हा धोका या अभ्यासात व्यक्त करण्यात आला असून केवळ मानवी श्वसन संस्थेवरच सार्स सीओव्ही २ (कोविड) परिणाम करत नसून मज्जासंस्थेवरही परिणाम करत आहे. याची महत्त्वाची लक्षणे म्हणजे गंध न येण, तोंडाची चव जाणे, डोकेदुखी, थकवा, मळमळ आणि उलट्या यासारख्या न्यूरोलॉजिक लक्षणांचा एक तृतीयांशपेक्षा जास्त व्यक्तींना त्रास होत असल्याचे अभ्यासात म्हटले आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ३३ रुग्णांच्या मेंदूचा संशोधकांनी अभ्यास केला. २२ पुरूष व ११ महिलांचा यात समावेश होता. श्वसन नलिकेशी जोडलेल्या घशाच्या वरच्या भागाचे या अभ्यासात परिक्षण करण्यात आले. ज्या ठिकाणी सर्वात आधी कोरोनाचा संसर्ग होतो. मृत्यूवेळी या रुग्णांचे वय ७१ होते. तर कोरोनाची लागण झाल्यानंतर आल्यानंतर ३१ दिवसांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे अभ्यासकांनी सांगितले. त्यांना सार्स-सीओव्ही २ चे अनुवांशिक घटक मेंदू आणि श्वसन नलिकेच्या भागात दिसून आले, त्याचबरोबर विषाणूचे कणही आढळून आल्याचा दावाही संशोधकांनी केला आहे.

सर्दी, खोकला आणि घशात खवखव होणे हीच लक्षणे कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात सांगण्यात येत होती. पण कोरोनाच्या लक्षणांमध्ये त्यानंतर भर पडत गेली. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना काही दिवसानंतर गंध न येणे, तोंडाची चव जाणे ही लक्षणे दिसून येऊ लागली. कोरोनाची ही लक्षणे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने त्यांचा कोरोनाच्या लक्षणांमध्ये समावेश केला होता.