चंदा कोचर यांचे अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले


नवी दिल्ली: आयसीआयसीआय बँकेच्या निलंबित मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी संचालक चंदा कोचर यांनी आपल्या निलंबनाविरोधात केलेले अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळली आहे.

आपल्या निलंबनाला आव्हान देणारी याचिका कोचर यांनी दि. २० नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. आपल्याला निवृत्तीनंतरचे निवृत्तीवेतन, बोनस, बँकेचे समभाग इत्यादी मिळावे, अशी विनंतीही कोचर यांनी केली होती. यापूर्वी निलंबनविरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती. खाजगी स्वरूपाच्या कराराच्या आधारे कारवाई करण्यात न्यायालयात आव्हान देता येत नसल्याचे कारण न्यायालयाने दिले होते.

कोचर यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी केलेला अर्ज बँकेने आधी मंजूर केला आणि त्यानंतर ४ महिन्यांनी निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा कोचर यांचा दावा होता. या कारवाईसाठी बँकेने रिझर्व्ह बँकेकडून परवानगी न घेतल्याने हा बँकिंग नियमन कायद्याच्या कलम ३५ बी (१) चा भंग असल्याचा दावा करून त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती.