विशेष पथक करणार डॉ. शीतल आमटे आत्महत्या प्रकरणाचा तपास


चंद्रपूर – विषाचे इंजेक्शन घेत ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे–करजगी यांनी सोमवारी आत्महत्या केली. तत्पूर्वी तातडीने त्यांना वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते, पण डॉ. शितल यांचा मृत्यू झाल्याचे तिथे उपस्थित वैद्यकीय अधिकार्‍यांनी घोषित केले. महाराष्ट्र पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून विशेष पथकाला या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे.

यासंदर्भात एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, शीतल आमटे यांचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद महाराष्ट्र पोलिसांनी केली आहे. त्यांचा मृत्यू चंद्रपूरच्या आनंदवन ग्रामपंचायत विभागात झाला. त्यांनी आत्महत्या केल्याची सर्वत्र चर्चा आहे. नागपूरहून विशेष तपास पथकाला त्यांच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. सध्या तपास सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतरच अधिक माहिती देणे शक्य असल्याची माहिती चंद्रपूरच्या पोलीस अधिक्षकांनी दिली.

सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी शीतल आमटे सांभाळत होत्या. त्या बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करीत होत्या. आमटे परिवारात मागील काही महिन्यांपासून अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला होता. शीतल आमटे या सर्व वादाच्या केंद्रस्थानी होत्या, असा आरोप वेळोवेळी झाला. हा अंतर्गत गृहकलह सुरू असतानाच त्यांच्या आत्महत्येचे वृत्त आले. त्या मानसिक तणावात असल्याचे काही दिवसांपूर्वीच त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले होते.